नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत जो प्रकार घडला त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांची मालिका काही थांबायला तयार नाही. आज दिवसभरात राजकीय मैदानात आणि त्याच्याबाहेरही यावरुन ब-याच घडामोडी सुरु होत्या. सभा झाली असती तर त्यावरुन जितका फायदा झाला असता त्यापेक्षा जास्त या न झालेल्या सभेचा करुन घेण्याच्या प्रयत्नात भाजप दिसतेय.
पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्यूंजय मंत्राचा जप, देशभरात भाजपच्या युवा मोर्चाची निदर्शनं, पंतप्रधानांच्या सुरक्षेची काळजी व्यक्त करत राष्ट्रपतींनीही घेतलेली भेट, काल पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याला सभा न करताच परत जावं लागलं आणि त्यानंतर सुरु झालेलं राजकीय महाभारत काही थांबायला तयार नाही. आता तर हा मुद्दा सुप्रीम कोर्टातही पोहचला आहे. उद्या सरन्यायाधीशांच्या पीठासमोर याची सुनावणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याला 15 मिनिटे रस्त्यावर अडकून राहावं लागलं. यात नेमकी चूक कोणाची हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण राजकीयदृष्ट्या या संकटाचं रुपांतर संधित करण्यात भाजप मागे नाही. याची पहिली झलक खुद्द पंतप्रधानांनीच दाखवून दिली आहे. काल भटिंडा एअरपोर्टवर पोहचल्यावर त्यांनी अधिका-यांना अपने सीएम को धन्यवाद कहना, जिंदा लौट आया म्हटल्याच्या बातम्या दिवसभर झळकत राहिल्या.
पंजाबमध्ये भाजपची ताकद फारशी नाही. पण पाच वर्षात इथलं राजकारण पूर्णपणे बदललं आहे. कधी भाजपसोबत असणारी अकाली आता वेगळी झालीय, तर काँग्रेसमधून बंडखोरी केलेले कॅप्टन अमरिंदर आता भाजपसोबत आलेत. पंजाबमधल्या प्रचारानं भाजपचं राजकीय नशीब किती चमकणार होतं माहिती नाही. पण आता या न झालेल्या सभेचा मुद्दा इतर राज्यांमध्ये महत्वाचा ठरु शकतो. काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पंतप्रधानांच्या जीवाला धोका असताना काँग्रेसचे नेते आनंद व्यक्त करत होते असं म्हणत हल्लाबोल केला.
स्मृती इराणींच्या या वक्तव्याला संदर्भ होता युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवासच्या ट्विटचा...हाऊज द जोश असं ट्विट करत सभा रद्द झाल्यानंतर त्यांनी केलं होतं. पण हे ट्विट केलं तोपर्यंत सभा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द झाल्याच्या बातम्या नव्हत्या असं म्हणत श्रीनिवास यांनी आपली बाजू मांडली आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा भाजपनं महत्वाचा बनवल्याचं आज दिवसभरच्या घडामोडींमधून दिसत होतं. पंतप्रधान म्हणून मोदींची लोकप्रियता हाच भाजपचा यूएसपी आहे. त्यामुळे आता त्यांच्या जीवाला धोका असं नॅरेटिव्ह करत भाजपनं रणनीती आखल्याचं दिसतंय. काँग्रेसला खिंडीत पकडण्यासाठी या मुद्द्यावर भाजप आक्रमक राहण्याचीही शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आधीच्या वेळापत्रकानुसार हेलिकॉप्टरनं सभेच्या ठिकाणी पोहचणार होते. पण खराब हवामानामुळे त्यांनी रोडमार्गे जाण्याचा निर्णय घेतला. आंदोलन करणारे कोण होते, त्यांच्या मागण्या काय होत्या, पंतप्रधानांना रोखण्याचा त्यांचा निर्धार कधीपासूनच होता यापेक्षाही आता पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्याचाच मुद्दा प्रभावी करत भाजपनं काँग्रेसवर हल्लाबोल सुरु केला आहे आता या रणनीतीला किती यश मिळतं हे पाच राज्याच्या निवडणुकीत कळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- PM Modi Security : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा भंगप्रकरणी उच्च स्तरीय समिती स्थापन, उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- PM Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेत पोलिसांकडूनच चूक? पोलिसांनी आंदोलकांना मार्गाची माहिती लीक केल्याचा दावा
- Lockdown : भारतात तिसऱ्या लाटेचं तांडव? जानेवारी महिन्यात पीक पॉईंट : शास्त्रज्ञांचा अंदाज