पुणे: राज्यातील पेपर फुटीचं सत्र सुरुच असून आता पुणे पोलिसानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील पेपरफुटीचे प्रकरण समोर आणलंय. यासाठी आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने महत्वाची भूमिका बजावली. या संयुक्त कारवाईत दोन माजी सैनिकांसह एका एजंटला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या माजी सैनिकांनी लष्कराच्या एका विभागातील व्हेईकल मेकॅनिक या पदाच्या भरतीचा पेपर फोडल्याचं तपासात समोर आलंय. 


जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स अर्थात जीआरईएफ या विभागासाठी ही 31 ऑक्टोबर 2021ला भरती पार पडली. या भरतीत चाळीस परीक्षार्थींना त्यांनी पेपर पुरवले होते. त्यापैकी 36 परीक्षार्थी पास होऊन, त्या पदावर रुजू झाल्याचा दावा पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलाय. या प्रकरणी निवृत्त लायन्स नाईक सतीश डहाणे, निवृत्त मिस्त्री श्रीराम कदम आणि एजंट अक्षय वानखेडे यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. 


आर्मी इंटिलिजन्स ब्युरोला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी 4 जानेवारीला रक्षक चौकात सापळा रचला होता. गजानन मिसाळ आणि धनंजय वट्टमवार यांना तिन्ही आरोपींनी संगनमत करून भरतीचे आमिष दाखवले होते. लष्कराच्या जीआरईएफ विभागातील व्हेईकल मेकॅनिक पदासाठीच ही भरती होणार आहे. त्या पदाच्या भरतीसाठीची पाच लाख रुपयांची बोली ठरली होती. त्यानुसार पहिली टोकन रक्कम पिंपरी चिंचवड परिसरात स्वीकारली जाणार होती. तीच सत्तर हजाराची रक्कम स्वीकारताना आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने त्यांना ताब्यात घेतलं. मग पिंपरी चिंचवड पोलिसांना पाचारण करून त्यांना अटक करण्यात आली. 


न्यायालयाने आरोपींना दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांकडून लष्कर भरतीशी संबंधित बनावट कागदपत्रे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी तपासणी केली असता 31 ऑक्टोबरला झालेल्या भरतीचा पेपर फोडण्यात आल्याचं समोर आलं. माजी सैनिकांकडे हे पेपर नेमके आले कुठून? याचा छडा लावण्याचं आता मोठं आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर आहे.


महत्त्वाच्या बातम्या :