Tukaram Maharaj Temple : अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर उभारलं (Tukaram Maharaj Temple ) जात आहे. या मंदिराचं आणि पुण्याच्या भंडारा डोंगरावर उभारलं जात असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज्यांच्या भव्य-दिव्य मंदिरात साधर्म्य आहे. श्रीरामांच्या आणि तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी एकाच खाणीतील दगड वापरले जात आहेत. सोमपुरा वास्तुविशारद आणि कारागीर इथं मंदिराची उभारणी करत आहे. तुकाराम महाराजांच्या मंदिराची पायाभरणी 2016 पासून सुरु आहे आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या मंदिर उभारणीला सुरुवात झाली एवढाच या दोन्ही मंदिरात फरक आहे. हा योगायोग घडून आल्याचं इथं पाहायला मिळतं. भंडारा डोंगरावरील या भव्य-दिव्य मंदिरांची अनेक वैशिष्ट्य ही आहेत.
भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांच्या मंदिराची वैशिष्ट्ये
गुजरातमधील अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारलं जात आहे. मंदिराची लांबी 179 फूट, उंची 108 फूट तर रुंदी 193 फूट इतकी भव्य आहे. मंदिराला तीन भव्य कळस असतील. मंदिराचा कळस 87 ते 96 फूट इतकं दिव्य असेल. मंदिराच्या मंडपाची शोभा वाढवणारा घुमट हा 34 फूट बाय 34 फुटांचा असेल. गर्भगृह 13.5 फूट बाय 13.5 फूट असेल. मंदिराला नऊ दरवाजे तसेच गर्भगृहाला पाच दरवाजे आणि सहा खिडक्या आहेत. मंदिरात मुख्य जागेवर विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची आणि त्यांना पाहण्यात मग्न असणारे संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. 25 हजार स्क्वेअर फुटांत 122 खांबावर (पिलर) हे भव्य दिव्य मंदिर उभं राहणार आहे. अंदाजे 150 कोटींचा याला खर्च येणार आहे.
60 वर्षांचं स्वप्न साकारत आहे...
मागील 50 वर्षापासून या मंदिराचं स्वप्न पाहतो आहोत. आमच्यासोबतच अनेक वारकऱ्यांचं हे स्वप्न आहे. भंडारा डोंगर तुकाराम महाराजांची कर्मभूमी आहे. गाथेची निर्मीतीदेखील याच ठिकाणी झाली आहे. जगण्यासाठी उपयोगाचे असलेले सर्व उपदेश तुकाराम महाराजांनी या गाथेत लिहून ठेवले आहेत. जिजामाता रोज महाराजांसाठी न्याहारी घेऊन याच डोंगरावर येत होत्या. त्यांनी अन्नदान केल्याशिवाय जिजामाता पाणीदेखील पित नव्हत्या. त्यामुळे या स्थानाला फार महत्व आहे. भक्तीचा हा कळस स्थान आहे आणि त्यामुळेच तुकाराम महाराजांच्या कळसाला साजेसं असं मंदिर असावं, अशी अनेकांची इच्छा होती. त्यामुळे 2016 साली या मंदिराचं बांधकाम सुरु केलं होतं. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकारांच्या हस्ते या मंदिराचं भूमिपुजन करण्यात आलं होतं, असं श्री क्षेत्र भंडारा डोंगर मंदिराचे विश्वस्त बाळासाहेब काशीद यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.