सांगली - राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचं मत, भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. या मदतीबाबत आपण पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन राष्ट्रपतींच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्याना राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही तोकडी आहे. या मदतीपेक्षा झालेलं नुकसान मोठं आहे, त्यामुळे मदत आणखी वाढवून दिली जावी याबाबत पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना भेटून वाढीव मदत मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे पाटील यांनी यावंळी सांगितलं. तसेच याबबत सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे देखील ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतीसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल (16 नोव्हेंबरला)मदत जाहीर केली. खरीप पिकासाठी प्रति 2 हेक्टरी 8 हजार आणि फळबागांच्यासाठी प्रति 2 हेक्टरी 18 हजार मदत जाहीर केली आहे. यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनीही राज्यपालांच्या या मदतीवर नाराजी जाहीर केली. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी असल्याचे मत व्यक्त करत एक प्रकारे भाजपला घराचा आहेर दिला आहे.

राज्याच्या राजकारणात शेतकऱ्याकडे दुर्लक्ष -
मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेशी फारकत घेऊन शिवसेनेने आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक साधली आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी या पक्षातील नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. दरम्यान, सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सुरुवातील भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र, पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपने सत्तास्थापन्यात असमर्थता दाखवली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही सत्तास्थापन करण्यात अपयश आले. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात सरकार नसल्यामुळं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

संबंधित बातम्या -

 आस्मानी संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी जाच - धनंजय मुंडे

 राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी, मदत वाढवून देण्याची 'महाशिवआघाडी'ची मागणी