मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज सातवी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आजरांजली वाहिली आहे. ट्विटरवरील एका व्हिडीओद्वारे फडणवीस यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याच प्रयत्न केला आहे. व्हिडीओमध्ये बाळासाहेबांनी स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश दिला आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करून दिल्याचे बोलले जात आहे. तसेच स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र बाळासाहेबांनी दिल्याचेही फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले होते. या दोन पक्षांनी युती करत तीनवेळा राज्यात सत्तास्थापन केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने चौथ्यांदा या दोन पक्षांना बहुमत दिलं आहे. परंतु सत्तावाटपाचा तिढा न सुटल्याने दोन्ही पक्ष विभक्त होण्याचा मार्गावर आहेत.

शिवसेना सध्या सेक्युलर भूमिका मांडणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करुन राज्यात सत्तास्थापन करण्याच्या तयारीत आहे. हे करत असताना शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा मागे पडेल, असे राजकीय विश्लेषकांचे आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करुन देत पुन्हा एकदा भाजपसोबत येण्याची अप्रत्यक्षरित्या साद घातली असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा वापरत देशभर राजकारण केले. त्यामुळेच बाळासाहेबांना प्रखर हिंदुत्वाचे प्रणेते मानले जाते. त्याच बाळासाहेबांची शिवसेना आज सेक्युलर भूमिका मांडणाऱ्या पक्षांसोबत आघाडी करत असल्याचे पाहून अनेक हिंदुत्ववाद्यांच्या तसेच सेक्युलर/लिबरल लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशावेळी भारतीय जनता पक्ष शिवसेनेला हिंदुत्ववादाची भूमिका न सोडण्याचे आवाहन करत आहे.

व्हिडीओ पाहा



व्हिडीओ पाहा