मुंबई : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) सामना म्हटलं की तो क्रिकेटपेक्षाही बराच मोठा विषय असतो. त्यातच आता या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील विश्वचषकामधील सामना अवघ्या काही तासांवार येऊन ठेपला असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या सामन्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तानचे भव्य स्वागत हे फक्त गुजरातध्येच आणि मोदी शाहांच्या  राज्यात होऊ शकते. आज जर बाळासाहेब असते तर यांना बुटाने मारले असते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेकडून आलेली प्रतिक्रिया ही या वर्षीच्या सामन्यासंदर्भातील पहिली राजकीय प्रतिक्रिया ठरली आहे.


महाराष्ट्रात एक सरकार आहे. जे स्वत:ला शिवसेना समजतात बाळासाहेबांचे नाव घेतात. परंतु  त्यांनी पाकिस्तानच्या स्वागतावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  पण जे गुजरातमध्ये झालेले आहे ते राष्ट्रहिताचे नाही.  जनतेला तुम्ही मूर्ख बनवत आहे. बाळासाहेब होते तेव्हा त्यांनी पाकिस्तानवर बंदी घातली होती . जम्मू कश्मीरमध्ये  जवान, कश्मीरी पंडितांच्या हत्या केल्या होत्या.अशा हिंदूस्तानच्या रक्ताने त्यांचे हात रंगले आहेत त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. आजही जम्मू काश्मिरला तीच परिस्थिती आहे आणि तरीही पाकिस्तानचे स्वागत होत आहे.  हिम्मत असेल तर एकनाथ शिंदे यांनी यावर बोलावे आता तर सगळेच त्यांचे आहेत.  त्यांना हिम्मत आहे का बोलायची आम्ही निषेध करतो, असे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. 


भाजप आणि गुजरात सरकारने हिंदूत्व आणि लाजलज्जा गुंडाळून ठेवली


भारत पाकिस्तान सामने व्हायला हवेत का यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. पाकिस्तानचे स्वागत जर राष्ट्रात किंवा देशाच्या अन्य भागात झाले असते तर हे कपडे काढून नाचले असते. आम्हाला राष्ट्रभक्तीचे धडे दिले असते.याच्यावर त्यांनी शाळा घेतली असती परंतु आज गुजरातमध्ये ज्या पद्धतीचं भव्य स्वागत हे केलं गेलं ते पाहता भाजप आणि गुजरात सरकारने हिंदूत्व आणि लाजलज्जा गुंडाळून ठेवलं आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.  “पाकिस्तानच्या टीमचे ग्रॅन्ड वेलकम करता, तुम्ही तिकडे जाऊन केक कापता,” असा टोलाही राऊत यांनी मोदींनी काही वर्षांपूर्वी अचानक तत्कालीन पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ यांना दिलेल्या भेटीच्या संदर्भाने लगावला.


घटनाबाह्य सरकारचे संरक्षण विधानसभा अध्यक्ष करत आहे


संजय राऊतांना अपात्रततेच्या सुनावणीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले,  महाराष्ट्राच्या विधिमंडळात ज्यांचे कान न्यायालयाने उपटले. विधिमंडळाला एक परंपरा आहे आणि महान लोक या खुर्चीवर बसले आणि त्यांनी संविधानाचे रक्षण केलं. पण आज दुर्दैवाने एक वर्षापासून घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रावर बसवलं गेलं आहे आणि यांचे संरक्षण हे विधानसभा अध्यक्ष करत आहेत.सर्वोच्च न्यायालयाने पोरखेळ हा शब्द वापरला इतिहासामध्ये अशा प्रकारची भूमिका कधी या देशात घेतली नव्हती आणि या महाराष्ट्राची प्रतिमा धूळीस मिळवण्याचा काम हे विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री सरकार हे सगळे करत आहेत.