मुंबई : गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये 20 जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार सुरु असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. गोव्यामध्येही महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्यासाठी हालचाली सुरु असून येत्या काळात त्यामध्ये अधिक स्पष्टता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


खासदार संजय राऊत म्हणाले की, "गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा विचार सुरु आहे. त्याला कितपत यश येतं हे आताच निश्चित काही सांगता येणार नाही, पण त्या संदर्भात हालचाली सुरु आहेत. त्या ठिकाणच्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगलं स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकेल." 


उत्तर प्रदेशातील लखनऊ शिवसेना प्रदेश कार्यालयाने 403 जागांवर निवडणुका लढण्याचं जाहीर केलं होतं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "उत्तर प्रदेशमध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा पक्षाचा विचार सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी संघटनांनी शिवसेनेला सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणूक लढा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इतर काही लहान पक्ष आहेत त्यांना देखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे."


चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर चौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, अशा शब्दांत सरकारमधील मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यांनं आपल्याकडे भावना व्यक्त केल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्याला शिवसेना खासदार संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. यानिमित्तानं राजकीय खडाजंगी रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं.


खासदार संजय राऊत म्हणाले की, "असा हवेत गोळीबार करून चालत नाही आणि कोणी कोणाच्या थोबाडीत वगैरे मारत नाहीत. चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आणखी कोणी लोक असतील, ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. पण मी वारंवार हेच सांगतो की हे सरकार पुढील तीन वर्ष देखील उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतर देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल."


महत्वाच्या बातम्या :