मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर चौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, अशा शब्दांत सरकारमधील मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यांनं आपल्याकडे भावना व्यक्त केल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्याला शिवसेना खासदार संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. यानिमित्तानं राजकीय खडाजंगी रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं. 


चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट


चंद्रकांत पाटील गौप्यस्फोट करताना म्हणाले होते की, "मित्र असलेला एक वरिष्ठ कॅबिनेट मंत्री मला म्हणाला की, आम्हाला इतकी अनपेक्षितपणे सत्ता मिळाली आहे. कल्पना नसताना. आम्ही गृहित धरलं होतं की, पुढचे पाच-पंचवीस वर्ष सत्ता नाही. तेवढ्यात अनपेक्षितपणे सत्ता मिळाली. त्यामुळे उद्या भर चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली, तरीसुद्धा आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही. हेतर नुसतं बोलतायत ना, शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष. पण थोबाडीत मारली तर आम्ही शांत राहू कारण एवढी अनपेक्षितपणे मिळालेली सत्ता आम्ही घालवू कशी? असं मंत्रिमडळातील एका कॅबिनेट मंत्र्यानं मित्र या नात्यानं मला सांगितलेलं वाक्य आहे. ही मानसिकता आहे." 


गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं प्रत्युत्तर 


चंद्रकांत पाटलांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ते एक मंत्री ना, ते एक मंत्री कोण? असं हवेत गोळीबार करुन चालत नाही. आणि कोणी कोणाच्या थौबाडीत वैगरे मारत नाही. चंद्रकांत पाटील असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे काही लोक असतील. ते अशाप्रकारच्या अफवा पसरवत असतील, त्यात त्यांना आनंद मिळत असेल. त्यांनी तो आनंद घ्यावा. पण मी वारंवार सांगतोय की, अजून तीन वर्ष हे सरकार उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतरसुद्धा महाविकासआघाडी सत्तेवर येईल, याबाबत निश्चिंत राहा."


दरम्यान, गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढतो आहोत. उत्तर प्रदेशमध्ये देखील निवडणूक लढवण्याचा विचार सुरु आहे. तशी चर्चा आमच्या पक्षांमध्ये सुरु आहेत. गोव्यामध्ये साधारणतः 20 जागा लढविण्याचा आमचा विचार आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.