Sanjay Raut: देशाची घटनात्मक संस्था असलेला निवडणूक आयोग भाजपचा बटीक झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच आता न्यायपालिकेमधील सुद्धा भाजपशी संबधित माणसे नेमण्यात येत असल्याचा हल्लाबोल पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर रोहित पवार यांनी आक्षेप व्यक्त करत हल्लाबोल केला. त्यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसकडूनही हल्लाबोल करण्यात आला आहे. दरम्यान, आज (6 ऑगस्ट) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आरती साठे यांच्या नियुक्तीवरून हल्लाबोल केला आहे.

Continues below advertisement


हा भारतीय न्यायव्यवस्थाचा दशावतार 


संजय राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाच ते सहा न्यायमूर्ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे तर ते शाखेत जात होते, त्यांचे कुटुंबही शाखेत जात होतं, असेही म्हटलं आहे. संजय राऊत आरती साठे यांच्या नियुक्तीवर बोलताना म्हणाले की हा भारतीय न्यायव्यवस्थाचा दशावतार आहे. भाजप प्रवक्त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की मुंबई हायकोर्टात भाजप प्रवक्त्यांची न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर चेन्नई कोर्टामध्येही भाजपच्या प्रवक्त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते म्हणाले की कोणताही प्रवक्ता हा त्या पक्षाच्या विचार झालेला बांधील असतो. मात्र, मुंबई उच्च न्यायालयातील पाच ते सहा न्यायमूर्ती हे शाखेत जात होते, त्यामुळे हा न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगासह देशातील घटनात्मक संस्था गुलाम असाव्यात यासाठीच लोक नेमले जात असल्याचा हल्लाबोल  संजय राऊत यांनी केला. 


राज्यसभेमधील खासदार अतिरेकी आहेत का? 


ते पुढे म्हणाले की, हे लोकशाहीसाठी घातक असून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तोच मुद्दा राज्यसभेमध्ये मांडल्याचा संजय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सीआयएसएफ जवान औद्योगिक सुरक्षा करतात. मात्र, त्यांना राज्यसभेमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यसभेमधील खासदार अतिरेकी आहेत का? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. अशाच पद्धतीने न्यायव्यवस्थेमध्ये माणसं घुसवण्यात आली आहेत. 


तर मग मतपत्रिकेवर मतदान घ्या 


दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर होणार नाही, असं निवडणूक आयोगाकडून बोललं जात आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ईव्हीएमचा वापर होणार आहे आणि व्हीव्हीपॅट लागणार नसेल आणि मग मतमोजणीला वेळ लागतो असं जर कारण देत असतील तर मग मतपत्रिकेवर मतदान घ्या, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून ईव्हीएम आणली जाणार आहेत जिथं सर्वात मोठा घोटाळा झाला आहे आणि त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य निवडणुका घेतल्या जाणार आहेत असा आरोपही संजय राऊत यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या