Sanjay Raut on Jammu Kashmir Terrorist Attack: काश्मिरमध्ये दहशतवादी सैनिकांवर हल्ले (Jammu Kashmir Terrorist Attack) करतात, त्याची चुणूकही सरकारला लागत नाही, जवानांच्या हौतात्म्यावर सरकार राजकारण करू पाहतंय, असं म्हणत ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट निशाणा साधला आहे. तसेच, संसदेत लोक कशी घुसली? असं विचारल्यावर आमचं निलंबन केलं, आता पुंछच्या बाबतीत प्रश्न विचारला तर आम्हाला देशाबाहेर काढतील. 


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "काश्मिरमध्ये आतंकवादी आमच्या सैनिकांवर हल्ले करतात, त्याची चुणूकही सरकारला लागत नाही. जवानांच्या हौतात्म्यावर सरकार राजकारण करू पाहतंय, दोन महिन्यांमध्ये जवानांच्या हत्येचा आकडा बघितल्यास, थरकाप होईल. संसद चालूच देत नाही. आम्ही प्रश्न विचारला की, संसदेत लोक कशी घुसली? आमचं निलंबन केलं. आता आम्ही पुंछच्या बाबतीत प्रश्न विचारला, तर आम्हाला देशाच्या बाहेरच काढतील. आमचं सदस्यत्व रद्द करतील. प्रश्नच विचारायचे नाही, ही कोणती लोकशाही?" 


"सरकारला लाज वाटत नाही, सरकार कोणता उत्सव साजरा करतंय? आणि कोणासाठी? विरोधी पक्षांच्या खासदारांची कत्तल करायची आणि त्याचवेळी आमच्या जवानांची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहून राम मंदिराच्या घंटा वाजवायला जायचं. या घंटा यांच्या डोक्यात आपटल्या पाहिजेत.", असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 


महाराष्ट्रातील आमदार तोडून, फोडून, मोडून सरकार तयार केलंय : संजय राऊत 


"तारीख पे तारीख तर सुरूच राहील, जेव्हा आमची वेळ येते त्यावेळी तारीख पे तारीख सुरू राहते. सर्वात मोठा गुन्हा तर या महाराष्ट्रात झाला आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील आमदार तोडून, फोडून, मोडून सरकार तयार केलं आहे. ते बेकायदेशीर आहे, याबाबत बोला, इतर बाबतीत बोलू नका.", असं संजय राऊत म्हणाले. 


राम मंदिर कोणा एकट्याची जहागीर नाही : संजय राऊत 


राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी अद्याप शिवसेनेला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ज्यांचं योगदान आहे, त्यांना कधीच बोलवणार नाही. अजून कोणत्याही प्रकारचं निमंत्रण आलेलं नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं मोठं योगदान राहिलं आहे. आम्हाला आमचा हिस्सा मिळणार नाही. सर्वकाही या लोकांनी केलंय. जर तुम्हाला राम मंदिराचं क्रेडिट घ्यायचं असेल, तर संसदेत जे घडतंय, पुंछमध्ये जे घडतंय याचीही जबाबदारी स्विकारा." पुढे बोलताना ते म्हणाले की, "राम मंदिर कोणा एकट्याची जहागीर नाही, अयोध्येत रामाचं मंदिर होणं हीच गर्वाची बाब आहे, कारण आमचं योगदान आहे. पण आम्हाला तो राजकीय मुद्दा करायचा नाही. आम्ही त्यावर मतं मागणार नाही. हे सर्व राजकीय उत्सव झाल्यानंतर आम्ही तिथे जाणार आणि रामललाचा आशीर्वाद घेणार."