मुंबई: बंड वगैरे काही नाही, ते पळून गेले, ज्यांना पळून जाऊन लग्न करायचं आहे त्यांना कोण कसं थांबवणार असा टोला शिंदे गटातील सांगत संजय राऊत म्हणाले. पळून जाणाऱ्यांना कारण हवं होतं, तं त्यांना मिळालं असंही ते म्हणाले. बंड वगैरे काही नाही, भाजपला शिवसेना संपवायची आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. ते एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात बोलत होते.
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा प्रयत्न केला गेला हे साफ खोटं आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री असताना या गोष्टी शक्यच नाही असं संजय राऊत म्हणाले.
ज्या दिवशी शिंदे आणि फडणवीस सरकार बनवण्याचं ठरवण्यात आलं त्या दिवशी कुणा-कुणाला अटक करायची याची यादी बनवण्यात आली, त्यामध्ये माझं नाव पहिल्या क्रमांकावर होतं असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. शिंदे-फडणवीस सरकारसाठी कोण अडचण ठरु शकतंय, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चार लोक दिल्लीला गेले होते असं संजय राऊत म्हणाले.
व्हिजन हे महाराष्ट्राचं असलं पाहिजे, एका व्यक्तीचं नको. उद्योगमंत्री बदलला की व्हिजन बदलतंय ही गोष्ट बरोबर नाही. उद्योगमंत्री कुणीही असो, व्हिजन कायम असायला पाहिजे, राज्याचा उद्योगमंत्री बदलला तरी किमान पाच वर्षे तरी व्हिजन बदलायला नको असं खासदार संजय राऊत म्हणाले. व्हिजन या शब्दाचा अर्थ बदलला, सत्ता मिळवणं हेच व्हिजन आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जायचं हे त्या पुढचं व्हिजन असल्याचंही ते म्हणाले.
मुंबईमुळे देशाचं पोट भरतंय, पण मुंबईला वाटा मिळतोय का? महाराष्ट्राला त्याचा वाटा मिळतोय का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. मिठी नदीच्या शुद्धीकरणासाठी 1700 कोटी रुपयांचा खर्च झाला असून त्यामुळे काहीच फरक पडला नाही. योगी आदित्यनाथ मुंबईत येतात आणि आमच्याकडील उद्योग नेतात. मुंबईतून उद्योग नेतात, पण इथं येऊन ते जी भाषा करतात त्याला आक्षेप असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले.
रोखठोक, धडाकेबाज, निडर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावान सैनिक म्हणजे संजय राऊत..
2019 च्या निवडणुकीनंतर जे स्वप्नातही कुणी पाहिलं नव्हतं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राऊतांनी जीवाचं रान केलं. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. पण त्यानंतर शिवसेनेच्या मागे संकटांची मालिकाही सुरु झाली. सुशांतसिंग केसपासून ते दिशा सॅलियनपर्यंत आणि नेत्यांच्या ईडी चौकशी होण्यापासून ते राऊतांच्या जेलवारीपर्यंत सगळं याच दोन वर्षांच्या काळात घडलं. पण तरीही भाजपशी मिळतंजुळतं घ्या अशी विनंती करणाऱ्यांना राऊतांनी जुमानलं नाही. मधल्या काळात झालेला राजकीय भूकंप हा संजय राऊत यांच्या आततायी भूमिकांमुळेच झाला.. पक्ष संजय राऊतांमुळेच फुटला.. असा आरोपही राऊतांवर झाला. त्यापुढे जाऊन आता निवडणूक आयोगात चिन्ह आणि पक्षाची लढाई, सुप्रीम कोर्टात आमदारांशी दोन हात आणि रस्त्यावर पक्ष वाचवण्यासाठी ठाकरेंना धावाधाव करावी लागतेय यालाही राऊतांनाच जबाबदार धरलं जातय.,. त्यामुळेच आता मशालीसह उद्धव ठाकरेंच्या सेनेचा प्रवास कुठल्या दिशेनं होणाराय? वंचितसोबत कालच झालेली आघाडी कशाचं द्योतक आहे? वंचित आणि राष्ट्रवादी एकाचवेळी सांभाळण्याची कसरत शिवसेना कशी करणार? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेसाठी काय रणनीती आहे? या सगळ्यावर आपलं व्हिजन काय आहे हे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :