Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या बैठकीत आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Amedkar) हे सहभागी झाले. प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी संपली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आंबेडकरांचा दावा फेटाळून लावला आहे. काही ठिकाणी रणनीती म्हणून आघाडीतील पक्ष वेगळे लढणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. प्रकाश आंबेडकरांसोबत झालेल्या आजच्या बैठकीत भाजपाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होईल, असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही यावर एकमत झाले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भाजपाला फायदा होईल, असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाऊल उचलणार नाही यावर एकमत झाले आहे. भाजपचा पराभव करणे हे एकमेव लक्ष्य आहे.देशातील वातावरण बदलण्सासाठी एकत्र राहणार.भाजपाचा पराभव करणे ही आमची प्राथमिकता असल्याचे सांगत आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे राऊत यांनी म्हटले.
इंडिया आघाडीत फूट नाही; राऊतांचा दावा
मविआ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यांशी बोलताना नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यासमोरच इंडिया आघाडी संपली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून काही मु्द्दे आहेत. पण इंडिया आघाडी फुटली नाही. काही रणनीतीनुसार निर्णय होत आहेत. त्यानुसार, पंजाब आणि बंगालमध्ये तसे निर्णय घेतले गेले आहेत. दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटप होणार असून पंजाबमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहेत. ममता बॅनर्जी या देखील भाजपच्या पराभवासाठी कार्यरत असणार असल्याचे राऊत यांनी म्हटले.
समान किमान कार्यक्रमासाठी समिती
प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीत समान किमान कार्यक्रम ठरवण्याची मागणी केली होती. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, समान किमान कार्यक्रमावर निर्णय घेण्यासाठी एका समिती गठीत करणार आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्या सुचनांचा समावेश करून समिती गठीत करण्यात येत असल्याचे राऊत यांनी सांगितले.