Prakash Ambedkar Maha Vikas Aghadi :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aghadi) बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) सहभागी झाले. बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी देशात इंडिया आघाडी (I.N.D.I.A. Alliance) संपली असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे नाना पटोले (Nana Patole), संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासमोरच केले. राज्यातही महाविकास आघाडी ही इंडिया आघाडीसारखी होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.


आज मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, रेखा ठाकूर यांनी सहभाग घेतला. तर, काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील,  जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत आदी उपस्थित होते. 


बैठकीत काय झाले?


आजच्या बैठकीतील चर्चेबाबत बोलताना प्रकाश आंबडेकर यांनी सांगितले की, आघाडीतील जागा वाटपावर पुढील टप्प्यावर चर्चा करणार आहोत. आज झालेल्या पहिल्या टप्प्यातील चर्चेत आम्ही आम्ही समान किमान कार्यक्रमावर चर्चा केली. त्यातील काही मुद्यांवर आज चर्चा झाली असून उर्वरीत मुद्यांवर लवकरच चर्चा होणार आहे. आघाडीचा समान किमान कार्यक्रम ठरल्यानंतर आम्ही जागा वाटपावर चर्चा करणार असल्याचे स्पष्ट वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. 


इंडिया आघाडी संपलीय, मविआचे तसे होऊ देणार नाही


प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीबाबत बोलताना म्हटले की, आता राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी आता उरली नाही. इंडिया आघाडीतून  नितीश कुमार, आप, ममता बॅनर्जी यांनी वेगळी चूल मांडली आहे. समाजवादी पक्षाने 16 जागांवर उमेदवार जाहीर केले. मात्र, समाजवादी सोबत राहिल असा विश्वास आहे. या आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची काळजी घेणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.