Sanjay Raut: राज्यातील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय शत्रुत्वामुळेच पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आपली अटक झाली. त्यामुळे राज्यातील अचानक बदललेली राजकीय परिस्थिती हीच आपल्या अटकेमागचं मुख्य कारण असल्याचा दावा करत संजय राऊतांनी हायकोर्टात आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. पत्राचाळ प्रकरणी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी झालेल्या अटकेनंतर राऊतांना मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी करत ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याला उत्तर देताना संजय राऊतांच्यावतीनं हायकोर्टात हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. यातून राऊतांनी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) जामीन रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेलाही विरोध केला आहे.
गोरेगाव येथील बहुचर्चित पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात ईडीनं बेकायदेशीरपणे अटक केल्याचं स्पष्ट करत विशेष पीएमएलए न्यायालयानं संजय राऊत यांची 9 नोव्हेंबर रोजी दोन लाखांच्या वैयक्तिक मुचलक्यावर जामीनावर सुटका केली. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ईडीनं तातडीनं मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करून या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्या याचिकेविरोधात प्रत्यूत्तरादाखल राऊतांच्यावतीनंही आता प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. ईडीची याचिका गुणवत्तारहीत, निराधार आणि राजकीय हेतूनं प्रेरीत असून विशेष न्यायालयानं जामीन मंजूर करताना नोंदवलेलं निरिक्षण आणि केलेल्या टिप्पण्या या सर्व तपासयंत्रणांसाठी प्रतिबंधात्मक म्हणून आवश्यक आहेत आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवणा-या असल्याचा दावाही राऊतनी यातून केला आहे.
विशेष पीएमएलए न्यायालयानं पक्षकाराला त्यांची बाजू मांडण्याची आणि युक्तिवाद करण्याची संधी दिली. पक्षकाराचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सर्व साक्षीपुरावे लक्षात घेऊनच जामीन मंजूर करताना ही निरीक्षणं नोंदवली आहेत. ईडीच्या उथळ कारभारावर आणि ठरवून अटकेच्या धोरणाचे आपण बळी पडल्याचा दावाही राऊतांनी केला आहे. आपण राजकीय नेते असल्यामुळे आपल्याविरोधातील कारवाई ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या विचारसरणी आणि कार्यपद्धतीमधील संघर्षातून झाल्याचंही राऊतांनी म्हटलेलं आहे.
गोरेगाव पत्रा चाळीचा पुनर्विकास व्हावा हे प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्याला हवं होतं. त्यासाठीच पत्रा चाळीच्या पुनर्विकासासाठीच्य बैठकांना आपण हजर होतो. कोणत्याही प्रकल्पावरील चर्चेच्या बैठकीत सहभागी होणं हा काही गुन्हा ठरत नाही. या प्रकरणी कुठेही बेकायदेशीर काम किंवा गुन्हा झाल्याचं सिद्ध करणारे कोणतेही पुरावे नसताना आपल्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली. त्यामुळेच अटकेची कारवाई ही केवळ राजकीय सुडबुद्धीनंच करण्यात आली होती, असा दावाही राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याविरोधात ईडीनं दोन प्रकरणे नोंदवली आहेत. मात्र राऊत यांच्या कुटुंबांतील व्यावसायिक व्यवहाराला इथं गुन्ह्याचं स्वरूप देण्यात आलं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे.