नवी दिल्ली : यूपीएच्या नेतृत्वावरुन सध्या सुरु असलेल्या चर्चेत आज पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रीय स्तरावरील काही नेते युपीए 2 करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्या चिंतेने मी बोलत आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. 


संजय राऊत म्हणाले की,  शरद पवार देशाचे नेते आहेत. युपीएविषयी बोलण्यासाठी त्यात असलं पाहिजे असं नाही.  देशात मजबूत विरोधी पक्ष आघाडी स्थापन झाली पाहिजे. महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी अभ्यास करावा. महाराष्ट्रात सहकारी आहोत. दिल्लीत चर्चा होईल. या विषयावर सोनिया गांधी बोलणार असतील तर आम्ही उत्तर देऊ.  या देशात उत्तम विरोधी पक्ष निर्माण झाला नाही तर भाजपचा पराभव कसा करणार याचं उत्तर द्यावे. याचं दिल्लीत येऊन उत्तर द्यावे. महाराष्ट्रात बसून देऊ नये. हा विषय जिल्हा किंवा तालुक्याचा नाही, असं राऊत म्हणाले. 


यूपीएचं नेतृत्व कुणाकडे? संजय राऊतांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून समाचार तर भाजपकडून खोचक प्रतिक्रिया 


ते म्हणाले की, भाजप समोर लढायचं असेल युपीए मजबूत होणे गरजेचे आहे. ते मजबूत होऊ नये असं महाराष्ट्रील लोकांना वाटत असेल तर तसं स्पष्ट सांगावे. तिसरी आघाडी, पाचवी आघाडी नौटंकी झाली ती फेल झाली. दिल्लीतील काही लोक युपीए 2 स्थापन करायच्या हालचाली करत आहेत. तसं होऊ नये म्हणून मी बोलत आहे.  काँग्रेस देशातील प्रमुख विरोधक आहे. त्यांच्यासह युपीए असायला पाहिजे, असं राऊत म्हणाले. 



Sanjay Raut | शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांची बॅटिंग


काल काय म्हणाले संजय राऊत?
काल संजय राऊत म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये नाराजी वगैरे काही नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. यूपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ यूपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी यूपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. तसंच यूपीए विकलांग झाली आहे, असंही संजय राऊत म्हणाले होते. 


काँग्रेस नेत्यांनी घेतला समाचार


राऊतांनी युपीए नेतृत्वाबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्यावर काँग्रेसच्या गोटातून देखील जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत यूपीएची चिंता संजय राऊत यांनी करु नये, तसंच यूपीएत नसताना यूपीएच्या नेतृत्वावर चर्चा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.  संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल विचारत, शिवसेना ही यूपीएची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. सोनिया गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. यूपीएची चिंता संजय राऊत यांनी करु नये, असेही पटोले म्हणाले.