मुंबई : नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधी पक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवटी जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं. अस कसं चालेल? अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर केली आहे.


रुपाली चाकणकरांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. #ParambirExposed या हॅशटॅगखाली केलेल्या ट्वीटमध्ये रुपाली चाकणकरांनी परमबीर सिंह यांच्या संपत्तीचा लेखाजोगा मांडला आहे. मुंबईत परमबीर सिंह यांचे दोन कोटी किंमतीचे दोन फ्लॅट तर हरियाणातील त्यांच्या गावी चार कोटी रुपये किंमतीचे घर असल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितलंय. तसेच परमबीरांच्या पत्नीच्या नावे मुंबईत आणि हरियाणातही कोट्यवधीची स्थावर मालमत्ता असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


अंधेरीतील वसुंधरा सोसायटीत 2003 साली परमबीरांनी 48.75 लाख रुपयांचा एक फ्लॅट घेतला तर 2007 साली नेरळमधील शगुफा सोसायटीत 3.60 कोटी रुपये किंमत असलेला एक फ्लॅट घेतल्याचा आरोपही रुपाली चाकणकरांनी केलाय. तसेच परमबीर सिंहांनी 2019 मध्ये हरियाणामध्ये 14 लाख रुपयांची जमीन खरेदी केली असून त्यांच्या हरियाणातल्या घराची किंमत चार कोटी रुपये असल्याची माहितीही रुपाली चाकणकरांनी दिलीय. 


 






परमबीर सिंहांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांचा फंड गोळा करावा असा आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लिहलेल्या एका पत्राच्या माध्यमातून दिली होती. त्यावरुन राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडाला आहे. 


परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. आता या आरोपांची चौकशी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला आहे. त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्याची सूचना सुप्रीम कोर्टानं केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशीचे करण्याचे आदेश द्यावेत. अशी फौजदारी जनहित याचिका आता माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी हायकोर्टात सादर केली आहे.


एकीकडे रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग याबाबत सरकार आक्रमक होत असताना दुसरीकडे माजी पोलीस आयुक्तांच्या आरोपांची आता चौकशी देखील होणार आहे. एकूणच महाविकास आघाडी सरकारने आता एकत्र येऊन या प्रकरणी सरकारची प्रतिमा सावरण्यासाठी कंबर कसली आहे.


संबंधित बातम्या :