Shivsena Leader Sanjay Raut : मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू भाजपचे केंद्र सरकार पोसत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आपणच कसे पोसतोय हे आता रोज दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात महाराष्ट्रातही स्फोट झाल्यास तेव्हा भाजप काय करेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 


शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील रोखठोक या स्तंभात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी भाजपवर हल्ला करताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी म्हटले की, मराठीचा दुस्वास करणारे, महाराष्ट्रातील शाळेत मराठी सक्तीची नको यासाठी उच्च न्यायालयात लढा देणारे भाजपचे पुढारी किरीट सोमय्या महाराष्ट्राची बदनामी आता रोजच करीत आहेत. 170 आमदारांचा पाठिंबा असलेले 'ठाकरे' सरकार या मराठी द्वेष्ट्यांविरुद्ध पाऊल उचलणार नसेल तर मराठी अस्मितेची नवी ठिणगी पडायला वेळ लागणार नसल्याचेही राऊत यांनी म्हटले. 


सोमय्या महाराष्ट्राच्या सरकारला धमक्या देतात. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची बदनामी करतात. महाराष्ट्राविरुद्ध कारस्थाने करतात आणि हे महान कार्य करत असल्याबद्दल भाजपच्या केंद्र सरकारने त्यांना केंद्र सरकारची खास 'झेड प्लस' दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू अशा पद्धतीने भाजपचे केंद्र सरकार पोसत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. 


महाराष्ट्र सरकारवर नाराजी?


अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात आहेत. इतरही मंत्री देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत लवकरच जातील, अशी धमकी काही मंडळी केंद्रीय पोलिसांच्या संरक्षणात देतात तेव्हा महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते, असा प्रश्न पडत असल्याचे राऊत यांनी म्हटले. भारतीय जनता पक्षाचे लोक धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत व रोज दुधाने स्नान करीत नाहीत. सत्तेतून व गैरव्यवहारातून प्रचंड पैसा व मनी लाँडरिंग त्यांनी केलेच आहे. राज्याची आर्थिक गुन्हे शाखा अशा वेळी काय करते असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्राचे गृहमंत्रालय व विधी न्याय मंत्रालय यांचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे असे वाटत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. दादरा नगर हवेलीचे  दिवगंत खासदार डेलकरांच्या आत्महत्येबाबत राज्य सरकारने एका 'एसआयटी'ची स्थापना केली. त्या एसआयटीने प्रफुल खोडा पटेलना चौकशीसाठी साधे समन्स पाठवू नये? हे धक्कादायक वाटत असल्याचे राऊत यांनी म्हटले.  


केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा घसरली


केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा घसरत चालली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ईडीचे सहसंचालक राजेश्वर सिंह हे आता उत्तर प्रदेशातील सरोजिनी नगरमधले भाजपचे उमेदवार झाले आहेत. याचा अर्थ असा की, असे अनेक राजेश्वर सिंह केंद्रीय तपास यंत्रणेत भाजपची राजकीय चाकरी करीत आहेत. म्हणूनच त्यांच्या कारवाया खोट्या, बनावट, सूडाच्या मानायला हव्यात असेही राऊत यांनी म्हटले. 


भाजपचे किरीट सोमय्या तर सरळसरळ ब्लॅकमेलिंग करत असल्याचे राऊत यांनी म्हटले. सोमय्या ईडी कार्यालयात जातात व उद्या कुणाला बोलवायचे व दम द्यायचा तो अजेंडा ठरवतात व पुन्हा ते तसे जाहीर करतात, उद्या ईडी कुणाच्या घरी पोहोचणार हे ते आधी जाहीर करतात. त्यानुसार ईडीच्या कारवाया होतात. हे घडत असल्याने मोदी व शहांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी म्हटले.