नागपूर : शिवसेना आमदर अपात्रतेप्रकरणी (MLA Disqualification) काल झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj) सुरतला गेले म्हणून मी पण गेलो असं सांगितलं. त्यांच्या याच वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिलीय. गद्दारांनी शिवरायांशी तुलना करु नये. असा टोला त्यांना लगावला आहे. तसेच गोगावलेंच्या वक्तव्यावर विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहे. नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती कंपनीच्या वखारी लुटण्यासाठी गेले होते. तुम्ही सुरतेला गेले होते ते महाराष्ट्राला लुटण्यासाठी तुम्ही पुढे सूरतमधून गुवाहाटीला गेले होते. गद्दारी आणि बंडामधे फरक आहे. गद्दारांनी शिवाजी महाराजांशी तुलना करू नये. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या. महाराज गुवाहाटीला गेले नव्हते. रेडे कापायला ते गुवाहाटी गेले नव्हते.
विरोधकांचा मुद्दा ऐकायचा नाही हे चुकीचे : राऊत
लोकशाही असलेल्या देशात अशाप्रकारची घटना घडू नये. विरोधकांचा मुद्दा ऐकायचा नाही हे चुकीचे आहे. विरोधक लोकशाहीचा एक स्तंभ आहे आणि तुम्ही तो पोकळ करत आहे. तुम्ही जर त्याला प्रतिसादच देत नसाल तर आमच्याकडे बॉयकॉट करण्याशिवाय पर्याय नाही, असे संजय राऊत म्हणाले.
प्रफुल पटेलांचा मिरचीचा ठेचा बाहेर आला : राऊत
नवाब मलिकांसंदर्भात लिहिलेल्या पत्रावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांसंदर्भात लिहिलेलं पत्र म्हणजे प्रफुल्ल पटेलांसाठीची सारवासारव आहे. प्रफुल्ल पटेलांचा जो मिरचीचा ठेचा बाहेर आला आहे ते त्यांना वाचवायचं म्हणून सांगितलं जातंय,
मलिकांना एक न्याय आणि प्रफुल्ल पटेल यांना दुसऱ्या न्याय असे का? दोघांवरही दाऊद संदर्भात आरोप आहे. मलिक यांना अस्पृश्य करता आणि प्रफुल पटेल यांना गृहमंत्री, प्रधानमंत्री गळाभेट घेता, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
धनुष्यबाण आमचा म्हणणारे कमळाबाईचे गुलाम: राऊत
शिवसेनेला जरी धनुष्यबाण आणि नाव दिलं असलं तरी त्यांना खात्री आहे की त्याचं डिपॉझिट जप्त होईल म्हणूनच ते भाजपच्या कमळावर निवडणूक लढवत आहे, धनुष्यबाण आमचा म्हणणारे कमळाबाईचे गुलाम होत आहेत, असा घणाघात संजय राऊतांचा शिंदे गटावर केला आहे.
केसरकरांनी सावंतवाडीतून निवडणूक लढवून दाखवावी, राऊतांचे आवाहन
आमच्याकडे आलेले सगळे उंदीर होते, जे कधी या बिळात त्या बिळात होते काल आमच्याकडे होते आज तिकडे आहेत. उंदरांचा कोणी पाठलाग करता का? उंदरामागे मांजर लागली की मांजर उंदराला खाऊन टाकते. केसरकर यांनी सावंतवाडीतून निवडणूक लढवून दाखवावी डिपॉझिट जप्त होईल, असे संजय राऊत म्हणाले.