मुंबई : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 352 अपमानित करणे, 115(2), मारहाण करणे , 3(5), संगनमत करून मारणे या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे. समाज माध्यमांमधील व्हिडीओ आणि स्थानिकांकडे केलेल्या चौकशीच्या आधारे या दखलपात्र गुन्ह्यांची नोंद केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
आपल्याला शिळं अन्न दिलं म्हणून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास कँन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्या संबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी जर गुन्हा दाखल झाला तर त्याला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली होती.
चांगल्या गोष्टीसाठी कितीही गुन्हे दाखल होवोत
मी कुठलाही मोठा गुन्हा केलेला नाही मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली आणि चांगल्या गोष्टीसाठी कितीही माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी आय डोन्ट केअर असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलं होतं. तर चौकशीसाठी कुणी तक्रार करावी असं नाही. पोलिस स्वत: चौकशी करू शकतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे.
anjay Gaikwad Controversy : नेमकं काय घडलं?
आमदार गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये जेवणं मागवलं. वरण आणि भाताचा पहिला घास खाल्यावरच त्यांना ते खराब असल्याचं लक्षात आलं. त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टिनमध्ये जात 'मला विष खायला घालतो का' असं विचारल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि तुफान मारहाण केली.
दक्षिण भारतीय लोकांवर टीका
आमदार निवासातील कँटिनचा मालक दाक्षिणात्य असून विरोधकांना त्याचा एवढा पुळका का आला आहे, असा सवालही संजय गायकवाड यांनी विरोधकांना केला होता. मारहाणीवरुन माझ्यावर विरोधक टीका करतात. मला त्यांना सांगायचं आहे की, महाराष्ट्र हा साऊथच्या लोकांनी नासवला. सगळ्या लेडीजबार, डान्सबारने तरुणाई बरबाद केली, महाराष्ट्राची संस्कृती खराब केली. मी जे केलं ते महाराष्ट्रातील लोकांसाठी केलं. मग तुम्हाला साऊथ इंडियन लोकांचा पुळका येण्याची गरज काय, असा सवाल संजय गायकवाड यांनी विरोधकांना विचारला.
ही बातमी वाचा: