मुंबई: आमदार निवासातील कँटीनमध्ये मिळणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी एका कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या घटनेमुळे मोठा राजकीय व सामाजिक संताप व्यक्त करण्यात आला असूनही, अद्याप पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज प्रतिक्रिया देताना म्हटलं, "या प्रकरणात पोलिसांनी निश्चितपणे चौकशी केली पाहिजे. अशा प्रकारच्या घटनांसाठी कोणतीही औपचारिक तक्रार आवश्यक नसते. जर गुन्हा दखलपात्र असेल, तर पोलीस स्वतःहून कारवाई करू शकतात." त्याचबरोबर विरोधकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आमदार गायकवाड यांच्याविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, त्यावर बोलताना संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)म्हणाले, मी चांगलं काम केलं चांगल्या कामासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी आय डोन्ट केअर. त्याचबरोबर आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.(Sanjay Gaikwad)
माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी आय डोन्ट केअर
मी कुठलाही मोठा गुन्हा केलेला नाही मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली आणि चांगल्या गोष्टीसाठी कितीही माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी आय डोन्ट केअर असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांना पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे.
एनसी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र म्हणजे एनसी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून एनसी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. आता संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मला कृत्याचा पश्चाताप नाही
संजय गायकवाड यांनीदेखील स्वत:च्या कृतीचे समर्थन केले होते. माझा मार्ग चुकला तरी मी जे केले त्याचा पश्चाताप नाही. किंबहुना मी मारहाण केल्यामुळेच निकृष्ट अन्न पुरवणाऱ्या कँटिनवर कारवाई झाली. मी फक्त जराशी मारहाण केली. त्यामुळे एनसी होऊ शकते. हा फार मोठा गुन्हा नाही. मलाही कायदा माहिती आहे. मी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून माहिती देणार आहे. त्यांना मी दोषी वाटत असेन तर मी ते देतील ती शिक्षा भोगायला तयार आहे, असे संजय गायकवाड यांनी म्हटले होते.