सांगली : मूळ सांगलीच्या आणि सध्या गोव्यात वास्तव्याला असलेल्या 11 वर्षांच्या उर्वी अनिल पाटील या चिमुरडीने हिमालयातील पीरपंजाल रेंजमधील 14 हजार 400 फुटांवरील 'हमता पास' सर केला आहे. इतक्या कमी वयात 'हमता पास' सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली आहे.


गेल्या वर्षी उर्वीने अवघड असा सरपास ट्रेक पूर्ण केला होता. कधी पाऊस तर कधी बर्फवृष्टी , कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत उर्वीने हे धाडस दाखवलं आहे. उर्वीच्या हमता ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील रुमसू बेस कॅम्पवरुन 3 जून 2019 रोजी झाली. पहिले दोन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे-छोटे ट्रेक केले. 5 जूनपासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली.

ब्रेकफास्ट न्यूज : चिमुकली माऊंटेनिअर, सारपास ट्रेक पूर्ण करणाऱ्या उर्वी पाटीलशी गप्पा



रुमसू हा 6 हजार 100 फुटावरचा बेस कॅम्प असून पुढे चिक्का (8,100 फूट), जुआरु (9,800 फूट) आणि बालुका गेरा (12,000 फुट) असे कॅम्प करत 14 हजार 400 फुटावरील हमता पास तिने सर केला. दिवसाला 7 ते 8 तासांचा डोंगर-दऱ्या आाणि बर्फातील हा प्रवास सलग पाच दिवसात पूर्ण करताना शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागल्याची प्रतिक्रिया उर्वीने दिली आहे.

साधारणपणे अशा प्रकारचे ट्रेक 16 वर्षांच्या युवक-युवतींसाठी असतात. मात्र उर्वीने मागील वर्षी वयाच्या दहाव्या वर्षी अत्यंत अवघड सरपास सर केला होता. त्यामुळे यावर्षी कैलास रथ या अॅडव्हेंचर ग्रुपने तिला आपल्यामध्ये सामावून घेतले.

असा सर केला हमता पास

हमता पास हा कुलू आणि स्पिती व्हॅलीला जोडणारा जुना मार्ग आहे. मार्गावरुन तिबेटीयन नागरिकांची ये-जा होते. या मार्गाला सिल्क मार्ग म्हणूनही ओळखले जाते. या ट्रेकिंगमध्ये बालुका गेरा ते रतनथळी व्हाया हमता पास हा ट्रेक सर्वाधिक अवघड होता. बालुका गेरा ते प्रत्यक्ष पासपर्यंत 8 तासांचा प्रवास पूर्णतः बर्फामधील असून सुमारे 2,400 फूट प्रत्यक्ष चढाईचे होते.

याशिवाय 10 हजार फुटांनंतर ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला पाऊस आणि पासवर बर्फवृष्टी असल्याने ट्रेक पूर्ण करताना दमछाक होत होती. पण अशा अवघड पासवर पोहचल्याचा आनंदच काही और होता, असं सांगताना उर्वीच्या चेहऱ्यावरही ते झळकतं.

तयारी उपयोगात आली

हिमालयातील हमता पास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम आणि योगा यावर लक्ष केंद्रित केले. सकाळी दोन तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे.  अर्धा तास योगा आणि खास जिम करायचे, असं उर्वी सांगते. आहारामध्ये प्रामुख्याने मत्स्याहार आणि सुकामेवा घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरचे कपडे, गॉगल, ट्रेकिंग बुट, स्टीकही खरेदी केली. त्याचा मला या प्रवासात खूप फायदा झाला, असं उर्वीने आत्मविश्वासाने सांगितलं. या ट्रेकसाठी आईस गाईड सुभाष राणा आणि मुंबईच्या केतन पटेल यांनी मदत केल्याचे उर्वी म्हणाली.

एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचे ध्येय

अवघड अशा सरपाससह हमता पास सर केल्याने माझ्यातील आत्मविश्वास दुणावला आहे. जगातील सर्वात अवघड एवरेस्ट शिखर सर करण्याच्या दिशेने वाटचालीतील हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. पुढील वर्षी पीन पार्वती आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचे ध्येय ऊअसल्याचे उर्वी सांगते.