मुंबई : आधीच मान्सूनला भारतात यायला उशीर झालेला असताना त्यातच पश्चिम किनारपट्टीवर वायू चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे मान्सून आणखी लांबण्याची शक्यता निर्माणा झाली आहे. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला बसणार नाही आहे. पण मान्सूनच्या लांबणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण पूर्व भागातील अरबी समुद्र, लक्षद्वीप, कर्नाटक आणि केरळच्या समुद्रातील 'वायू' चक्रीवादळ उद्या अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जरी चक्रीवादळाचा धोका नसला तरी त्याचा परिणाम राज्यातील मान्सूनच्या आगमानावर होणार आहे. या चक्रीवादळामुळे सर्वात जास्त प्रतिक्षा असलेल्या मान्सूनची उशिरानं वर्दी देण्याची शक्यता आहे.

VIDEO | वायू चक्रीवादळ महाराष्ट्र किनारपट्टीच्या दिशेने, आज, उद्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला | एबीपी माझा



केरळमध्ये मान्सून 1 जूनला येणं अपेक्षित असतं पण तब्बल सात दिवस उशीरा म्हणजे 8 जुनला तो केरळमध्ये दाखल झाला. महाराष्ट्रात 7 जूनला त्याचं आगमन होत पण, यंदा ती वेळसुद्धा मान्सूनने पाळली नाही.  केरळ ते कोकण हे अंतर पार करण्यासाठी मान्सूनला यंदा किमान 14 तारीख उजाडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

दरम्यान या वादळाचा मोठा धक्का गुजरातला बसण्याची शक्यता आहे.  या वादळामुळे पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजदेखील वर्तवला आहे. वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचा पाऊस पुढे पाकिस्तानच्या दिशेनं सरकण्याची शक्यता आहे.