सांगली : मिरज शहर परिसरात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे यात एका महिला टोळीचाही समावेश आहे. मिरजमधील लोणार गल्ली, किसान चौक, अमर टॉकीज या परिसरात एकूण सहा महिलांच्या टोळीने दुकानाचे शटर कटावणीने उचकटून दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेले रोख रक्कम दुकानातील कपडे, साबण असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
देवीच्या मंदिरावर डल्ला, सोन्या-चांदीचे दागिने लंपास
दुसरीकडे मिरज-कोल्हापूर रोडवरील चामुंडेश्वरी देवीच्या मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरी झाली. एका चोरट्याने देवीच्या मूर्तीसह अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य लंपास केलं. शहरातल्या खाजा वस्तीत हा प्रकार घडला आहे. हा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अंदाजे 15 ते 20 तोळे सोन्याचे दागिने आणि सात किलो चांदीची मूर्ती अशा मुद्देमालाची चोरी झाली आहे.
पहाटे मंदिरात कोणी नसल्याचा फायदा उठवत चोरट्याने डल्ला मारला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या चोरीची माहिती मिळताच मिरजेच्या महात्मा गांधी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत, पंचनामा करत तपास सुरु केला आहे.
चोरांच्या शोधासाठी पथकांची स्थापना
महिलांच्या आणि पुरुषाच्या टोळीने पहाटेच्या सुमारास सर्व चोऱ्या केल्या आहेत. शहरात तीन ठिकाणी झालेल्या या चोर्यांमध्ये सुमारे पावणे दोन लाख रुपयांची रोकड आणि ऐवज लंपास झाल्याचं समोर आलं आहे. या चोरट्या महिलांच्या शोधासाठी तीन पथके तयार करण्यात आली असून देवीच्या मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीच्या शोधासाठीही पथकं तैनात करण्यात आली आहेत.