सांगली : महिला तहसीलदाराने डॅशिंग कारवाई करत, वाळू तस्करांना चांगलाच धडा शिकवला. कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी एका रात्रीत वाळू तस्करी करणारे तब्बल 13 ट्रक पकडले.


शिल्पा ठोकडे यांच्या धडक कारवाईमुळे सोलापूर, सांगली जिल्ह्यातून वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांच्या पायाखालची वाळू सरकली.

शिल्पा ठोकडे यांनी गुरुवारी रात्री भिवघाट- तासगाव रोडवर एकाच रात्रीत वाळूची तस्करी करणारे  १३  ट्रक पकडले. विशेष म्हणजे एका महिला अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने रात्रीत ही कारवाई केल्याने, परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

सर्व ट्रकमधील वाळू पंढरपूरहून सांगली, कोल्हापूर आणि मिरजेला नेण्यात येत होती.  या कारवाईतून जवळपास ३६ लाखाचा दंड वसूल होईल, अशी माहिती तहसीलदार ठोकडे यांनी दिली.

यापूर्वी वाळू तस्करांनी अनेक सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले केले आहेत. मात्र डॅशिंग शिल्पा ठोकडे यांनी अशा हल्ल्यांना न जुमानता धडक कारवाई केली.