Sangli : इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! या लढ्यात काही क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून 9 ऑगस्टला 'क्रांती दिन' पाळला जातो. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील बलवडीमधील भाई संपतराव पवार यांच्या क्रांती स्मृतीवनात देशासाठी हुतात्मा झालेल्यांच्या नावे 2000 साली जी चिंचेची झाडे लावली होती त्या झाडांवर आता हुतात्म्यांचा इतिहास आधुनिक रुपात साकारला आहे. वनातील एक ना एक झाडावर क्यूआर कोडच्या माध्यमातून हुतात्माच्या कामगिरीचा इतिहास येणाऱ्या पिढीसमोर आधुनिक रुपात मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय.
भाई संपतराव पवार यांनी 2000 हजार साली हे स्मृतीवन उभारले आहे. आज 22 वर्षानंतर या वनात ज्या हुतात्माच्या नावे झाडे लावले होती ती झाडे मोठी झालीच. शिवाय स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्याच्या कार्याची आठवण देखील हे वन आज करून देतेय. येरळा काठावर संपतराव पवार यांनी स्वत:च्या 5 एकर जागेत क्रांतिस्मृतीवनाची निर्मिती केली. मुलांचा सहभागातून हे क्रांतिवन साकारले. प्रवेशद्वारापासून क्रांतिवनाकडे जाणाऱ्या मार्गावर वेलीचा बोगदा साकारला जो मनमोहक आहे.
मागील 22 वर्षांपासून या स्मृतीवनातील झाडे हुतात्माच्या कार्याची आठवण करून देत होते. मात्र आधुनिक जगात वावरताना हे स्मृती वन देखील हायटेक असावे या संकल्पनेतून वनातील जे झाड ज्या हुतात्माच्या नावाने आहे. त्या हुतात्माची माहिती कुणाचीही मदत न घेता मिळावी या उद्देशाने झाडांवर क्यू आर कोडच्या लावून हुतात्म्याचे कार्य समजून घेता येऊ शकेल का असा विचार संपतराव पवार यांनी केला.यासाठी त्यांनी पुणे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या मदतीने आणि पुढाकाराने प्रत्येक झाडावर क्यू आर कोड बसविले. यामुळे तरुणांना हुतात्म्यांच्या इत्यंभूत माहिती कुणाच्याही मदतीशिवाय मिळण्यास मदत होतेय. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर हुतात्म्यांच्या माहिती मराठी - हिंदी - इंग्रजी या तीन भाषेत सहज उपलब्ध होतील अशी यंत्रणा तयार केलीय जेणेकरून हुतात्मे जणू संवाद साधत झाल्याचा प्रत्यय येतोय. तसेच या वृक्षाभोवती स्मृती कट्टे तयार केले आहेत. जेणेकरून हुतात्म्यांच्या सानिध्यात बसता यावे, यासाठी कट्टे देखील बांधले आहेत.
अशा अनोख्या पध्दतीने उभारलेल्या आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या स्मृती वनाच्या रुपात हुतात्म्यांचे समरण आणि त्याच्या कार्याची आठवण आधुनिक रुपात ठेवण्याने वर्षानुवर्षे देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्याचे गुणगान या स्मृती वनातील झाडे गात राहणार आहेत.