सांगली : सांगलीतील पलूसमधील सर्जेराव हिंदुराव नलवडे यांनी आपले कुलदैवत असलेल्या जोतिबा देवाच्या मंदिर परिसरात लावण्यासाठी जवळपास एक टन वजनाची पंचधातूपासून बनवलेली ही महाघंटा आहे. लवकरच जोतिबा डोंगरावर या घंटेची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गिनीज बुकात नोंद होण्यासारखी ही महाघंटा बनवण्यात आली आहे. या घंटेच्या चहूबाजूने ओम, सूर्य, चंद्र, त्रिशूल ,डमरु काढले गेले आहे. यामुळे या घंटेच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे. पलूसमधीलच कारागिराच्या मदतीने ही घंटा बनवण्यात आली आहे.
जोतिबा मंदिराच्या आवारात शुक्रवारी 27 मे 2022 रोजी एक टन वजनाची पंचधातूची महाघंटा बसणार आहे. पलूस-बुर्ली येथील भाविक सर्जेराव हिंदुराव नलवडे हे स्वखर्चाने बनवलेली ही महाघंटा 'श्री' चरणी अर्पण करणार आहेत. नलवडे हे जोतिबा देवाचे निस्सीम भक्त असून दर रविवारी आणि पौर्णिमेदिवशी डोंगरावर येतात. 2000 मध्ये त्यांनी यापूर्वी जोतिबा मंदिरावर एक घंटा बसवली होती. मात्र गेल्यावर्षी ही घंटा तडे गेल्याने खराब झाली होती. नलवडे यांना हे समजताच त्यांनी नवीन घंटा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पलूसमधीलच केदार मेटल फौंड्रीत या महाघंटेचे काम सुरु केलं. जवळपास सहा महिने ही घंटा बनवण्याचं काम सुरु होतं. आता या घंटेचं काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ही घंटा विधिपूर्वक जोतिबा डोंगरावर बसवली जाणार आहे.
शुक्रवारी 27 मे 2022सकाळी साडेनऊला या महाघंटेची देवबावी तलावाच्या पश्चिम बाजूच्या जागेवर विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यावेळी महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार संजयकाका पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विनय कोरे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थित जोतिबा डोंगरावर घंटा बसवण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
गिनीज बुकात नोंद होण्यासारखी ही महाघंटा असून ही तयार करताना आध्यात्मिकता आणि विज्ञानाचाही वापर केला आहे. पंचधातूपासून ही घंटा बनवली असल्याने या या घंटेचा आवाज देखील चांगल्या पद्धतीने घुमतो. या घंटेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या घंटेच्या चहूबाजूने ओम, सूर्य, चंद्र, त्रिशूल, डमरु कोरलं आहे. यामुळे या घंटेच्या सौंदर्यामध्ये आणखीच भर पडली आहे.
अशी आहे पंचधातूने घडवलेली महाघंटा
घंटेची एकूण उंची पावणेचार फूट
वजन - जवळपास एक टन
घेर - 40 इंच आणि उंची 44 इंच
लंबकाचा कोन - 360 अंश
घंटा बनवण्याचा कालावधी - सहा महिने
देणगीदार - सर्जेराव हिंदुराव नलवडे, बुर्ली
घंटा घडवणारे - केदार मैटल फौंड्री, पलूस