सांगली : सांगलीतील जत तालुक्यात आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. जत आणि सातारा पोलिस एका आरोपीच्या शोधात प्रतापपूर गावात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
सातारा जिह्यात एका गुन्ह्यातील आरोपीला पकडायला जत आणि सातारा पोलिसांचं संयुक्त पथक मंगळवारी रात्री प्रतापपूर गावात गेले होते. मात्र या ठिकाणी तो सापडला नाही. तो नसल्याने पोलिसांनी त्याच्या भावाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे जमलेल्या जमावाने पोलिसांना जोरदार विरोध केला.
यानंतर पोलिस आणि जमावामध्ये वादावादी सुरु झाली. यावेळी जमावाने पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. ज्यात पोलिसांच्या दोन गाड्यांचं नुकसान झालं तर काही पोलिस जखमीही झाले. यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
या घटनेनंतर गावात काही तास तणावाचं वातावरण होतं. पोलिस बंदोबस्त वाढवला असून परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं जतचे पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुडे यांनी सांगितलं.
दरम्यान, पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे.