सांगली : जम्मू-कश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सांगली महापालिकेकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. यामध्ये पालिकेचे सर्व नगरसेवक,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून या सर्वांनी एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने पार पडलेल्या सद्भावना सभेत महापौरांनी हा निर्णय जाहीर केला.


सांगली-मिरज-कूपवाड महापालिकेकडून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. महापालिकेचे 2700 कर्मचारी आणि सर्वपक्षीय 83 नगरसेवकांनी आपला एक दिवसाचा पगार, मानधन शहीदांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय आज जाहीर केला.

एकूण 10 लाख 28 हजारांची एक दिवसाच्या पगाराची रक्कम शहीदांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे. सांगली महापालिकेत आज शिवजयंतीनिमित्त सद्भावना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम शहीद जवानांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली, याप्रसंगी महापौर संगीता खोत, पालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अप्पर आयुक्त मौसमी बर्डे-पाटील यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.