सांगली : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकारणात दिमाखदार एन्ट्री केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. सेनापती नसताना मावळ्यांनी गड राखला हे दाखवून दिलं अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली. एबीपी माझाला त्यांनी एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. 


रोहित पाटलांच्या आई आमदार सुमन पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्या या निवडणुकीत भाग घेऊ शकल्या नाहीत. त्यामुळे या निवडणुकीची सगळी जबाबदारी ही रोहित पाटील यांच्यावर होती. रोहित पाटील म्हणाले की, "खरंतर मी त्यावेळेस सांगितलं होतं. ताई शस्त्रक्रियेमुळं उपस्थित राहू शकल्या नाहीत. परंतु, सेनापतीला आपण दाखवून द्यायचं होतं की, मावळ्यांनी गड राखलेला आहे. आज आपण कुणालाही हिणवायचं नाही. या शहरातील कार्यकर्त्यांनी नागरिकांनी ज्या आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, त्या आपल्याला येणाऱ्या काळात पूर्ण करायच्या आहेत", असं रोहित पाटील म्हणाले आहेत


हा विजय कवठेमहांकाळच्या जनतेचा आहे, येत्या काळात तालुक्याचा चेहरा बदलणार असल्याचंही रोहित पाटील म्हणाले.


आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही : रोहित पाटील 
रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर. आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती. रोहित पाटील यांनी जे बोलले होते, ते करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे. निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असं रोहित पाटील म्हणाले होते. आता निकालानंतर रोहित पाटील यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. रोहित पाटील म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही" 


महत्त्वाच्या बातम्या :