सांगली : पाचशे रुपयांच्या नोटा घड्या घालताच तुटून पडण्याचा धक्कादायक प्रकार सांगलीतील विट्यात घडला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांना प्रात्यक्षिक दाखवलं आहे. जवळपास 500 रुपयांच्या 14 नोटांबाबत (म्हणजे तब्बल सात हजार रुपये) हा प्रकार घडला असून यासंदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडियाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी अनिल राठोड केली आहे. मात्र या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.


नेमकं काय घडलं?
अनिल राठोड यांच्या शेजारी एक वृद्ध महिला राहते. ती रोजंदारीवर मोलमजुरी करते. तिला दीड महिन्यापूर्वी सात हजार रुपये मिळाले होते. ते तिने पाकिटात घालून कपाटात ठेवले होते. काल (15 मे) त्यातील साडेतीन हजार रुपये बाहेर काढून रुमालात बांधून मिरच्या आणण्यासाठी बाजारात ती गेली. त्यानंतर रुमाल उघडून पैसे द्यायचे म्हणून पाचशेची एक नोट काढताच 500 रुपयांची एक नोट घडी पडून तुकडा पडल्याचे आढळले. त्यानंतर तिने दुसरी नोट काढली असता ती नोट सुद्धा घडी पडताच तुटत असल्याचं आढळलं. घाबरुन त्या महिलेने सर्व नोटा घडी करुन पाहिले असता त्या नोटांचे तशाच प्रकारे तुकडे पडत असल्याचे दिसलं. यावर त्या महिलेने अनिल राठोड यांच्याकडे जाऊन घडला प्रकार सांगितला. त्यांनाही तशाच प्रकारे नोटांचे घड्या घालताच तुकडे पडत असल्याचं आढळलं.


सांगलीत चलनातून बाद झालेल्या एक कोटी रुपयांच्या नोटा जप्त, चौघांना अटक


बँक अधिकारी काय म्हणाले?
यानंतर राठोड यांनी तात्काळ विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संपर्क साधला. तिथे शाखाव्यवस्थापक दळवी यांनी संबंधित नोटा या केमिकलच्या अथवा अति उष्णतेच्या संपर्कात आल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला. मात्र आमच्या शाखेत आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अशा प्रकारच्या नोटा या वर्षानुवर्षे कपाट बंद असतात त्यांना काहीही होत नाही, असं उत्तर दिलं. परंतु राठोड यांचं त्यावर समाधान झालं नाही. त्यांनी ही गोष्ट आपण रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या निदर्शनास आणावी, असा आग्रह केला. त्यानंतर सध्या राठोड यांना पाचशे रुपयांची एक नोट जी बऱ्यापैकी एका बाजूने तुटली होती ती बदलून देण्यात आली आहे. परंतु उरलेले तीन हजार रुपयांचे तुकडे आम्ही बदलून देऊ शकत नाही, उत्तर बँकेकडून दिलं आहे.


सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त, तिघांना अटक



नव्या नोटा हलक्या दर्जाच्या : शाखा व्यवस्थापक
विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटा या पूर्वीच्या नोटांच्या तुलनेत हलक्या दर्जाच्या आहेत, असं शाखा व्यवस्थापकांनीही मान्य केलं आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली असून अनेकांनी आपापल्या पाचशेच्या नोटा बदलून अथवा मोडून सुट्टे करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत बँक ऑफ इंडिया अथवा संबंधित यंत्रणेने लक्ष घालावं, अशी मागणी होत आहे.

तोट्यातील 112 कोटी चलनात दाखवा, सुप्रीम कोर्टाचा आठ जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिलासा