सांगली :  कोरोनाच्या काळात मृत्यूमुखी पडणाऱ्या मृतदेहांचे अंतिम संस्कार पार पडणं म्हणजे एक दिव्यच झालं आहे.  मरणा अगोदर बेड मिळत नाही आणि मरणानंतर अंत्यसंस्कार करण्यात अडचण अशा विवंचनेत अनेक जण सापडलेत. कोरोना मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य समजून सामाजिक कार्यकर्ते पुढं येत आहेत. त्यातीलच सामाजिक संघटना म्हणजे मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आणि जमियत उलेमा ए हिंद.


या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकटात आपलं सामाजिक काम सुरूच ठेवलंय.  जिथं कोरोनाने कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मयत झाली की, दफनविधी, अंत्यसंस्कार करण्यासाठी सहसा कोण पुढं येत नाहीत. अशीच घटना नागजमध्ये घडलीय. नागजमध्ये एका आजारी असलेल्या महिला रुग्णाला मिरजमध्ये बेडसाठी फिरावे लागले.  अखेर क्रीडा संकुल मिरज इथल्या कोविड सेंटर मध्ये बेड मिळाल्यानंतर उपचार सुरू असताना तिचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. 


नागज इथं मृतदेह नेण्याची तयारी झाली पण गावातल्या लोकांनी मृतदेह आणू नका तिकडेच अत्यसंस्कार करा असा निरोप दिला. आता अंत्यसंस्कार पार पडण्याचे दिव्य होते. मृतांच्या नातेवाईकांना मदनी ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंद या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संपर्क करून दिला गेला. मदनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांनी क्रीडासंकुल इथल्या कोविड सेंटर मध्ये जाऊन सदर महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्याचे सोपस्कार पार पाडून हिंदू पद्धतीने मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर असलेल्या स्मशान भूमीत अत्यसंस्कार केले.


आतापर्यंत कोरोनाच्या काळात दीडशेहून अधिक मृतदेहाचे दफनविधी आणि नऊ मृतदेहाचे अंत्यसंस्कार या दोन्ही संघटनेच्या वतीने कोणताही मोबदला न घेता करण्यात आले आहे. कोरोनाने जाती धर्माच्या भिंती पार मोडून काढल्या आहेत . या संघटनांनी सामाजिक ऐक्य अजूनही जिवंत असल्याचे दाखवून देत प्रत्यक्षात काम करत ऐक्य आणखी वृद्धिंगत केलं आहे. मरणाआधी आणि मरणानंतर मृतदेहाची हेळसांड होत असताना अंत्यसंस्कार आणि दफनविधी करून रमजानच्या पवित्र महिन्यात सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंदने पुण्याई कमवत सामाजिक ऐक्याचे दर्शनही घडवलं आहे.