सांगली : सोशल मीडियाची भुरळ लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच पडली आहे. मात्र त्याचा वापर कधी, कसा करावा याचं भान प्रत्येकाने राखणं गरजेचं आहे. सांगलीत कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत शासकीय अधिकारी चक्क फेसबुकमध्ये मश्गुल होते. विशेष म्हणजे हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
संभाव्य टंचाई आणि दुष्काळाच्या गंभीर विषयावर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तातडीची आढावा बैठक बोलावली होती. आधीच या बैठकीला अनेक अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती, तर बैठकीला उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना याचं काही गांभीर्य नसल्याचं दिसून आलं.
यावेळी अनेक अधिकारी बैठक सुरु असताना फेसबुक, व्हॉट्सअॅपमध्ये गुंग असल्याचं दिसून आले. त्यामुळे या अधिकाऱ्यांना दुष्काळ आणि टंचाईचे किती गांभीर्य आहे हे दिसून आलं. विशेष म्हणजे समोर मंत्री सदाभाऊ खोत असतानाही काही अधिकारी चक्क सोशल मीडियामध्ये गुंग असल्याचे चित्र पाहायला मिळालं. यावर खोत यांनी अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं.