सांगली : अनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर तातडीनं कारवाई करा, अशी संतप्त प्रतिक्रिया अनिकेतच्या आई-वडिलांनी केली आहे. दुपारी पत्रकार परिषदेत घेऊन अनिकेतच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. अनिकेत काम करत असलेल्या दुकानाच्या मालकासोबत झालेल्या भांडणाशी त्याच्या हत्येचा संबंध असावा, असाही दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.


सिंधुदुर्गातील आंबोली महादेवगड पॉईंटवर पोलिसांनी अर्धवट अवस्थेत जाळून टाकलेला अनिकेत कोथळेचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला. अनिकेतच्या मृत्यूबाबत तीव्र संताप व्यक्त करत सांगलीमध्ये पोलिसांविरोधात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू


दरम्यान, अनिकेत कोथळेच्या कुटुंबाने त्याच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. हरभट रोड वरील लकी बॅग हाऊस या शॉपमध्ये अनिकेत बॅग विकण्याचं काम करत होता. एक महिना अगोदरच या बॅगच्या दुकानात त्याने काम करायला सुरुवात केली होती.

अनिकेतला अटक होण्याच्या एक दिवस अगोदर बॅग हाऊसच्या मालकाबरोबर त्याचं भांडण झालं होतं. त्यामुळे यातून हत्या झाली असल्याचा अंदाज अनिकेतचा भाऊ आशिषने व्यक्त केला आहे.

अनिकेतने त्याच्या मित्रासोबत चोरी केली असल्याचा बनाव पोलिसांनीच केला होता. लकी बॅग हाऊसचा मालक आणि पीएसआय युवराज कामटे यांनी संगनमताने हत्या केली आहे. कामटे आणि त्या बॅग हाऊसच्या मालकांची सतत उठबस होती, डीवाय एसपी दीपाली काळे यांनी देखील  माहिती लपवली आहे, असं अनिकेतचे कुटुंबीय म्हणाले.

या प्रकरणाचीही चौकशी व्हावी. पोलिस स्टेशन आवारातच मयत अनिकेतचे दहन करण्याची परवानगी द्यावी. या प्रकरणाचा एकमेव साक्षीदार असलेला अमोल भांडरेला आणि आम्हाला संरक्षण मिळावे, अशी मागणी अनिकेतच्या कुटुंबाने केली आहे.

सांगली पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करत अनिकेथ कोथळेला मारहाण केली. मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह जाळून त्याची परस्पर विल्हेवाटही लावली होती. याप्रकरणी संशयित आरोपीला पोलिस विभागातून निलंबित करण्यात आलं असून इतर आरोपींना बारा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.