Sandipan Thorat Death : पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून (Pandharpur Lok Sabha Constituency) सलग सातवेळा निवडून आलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात (Sandipan Thorat) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून थोरात यांच्यावर सोलापुरातील (Solapur) खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान काल (31 मार्च) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षापासून संदीपान थोरात हे राजकारणापासून दूर राहिले होते. त्यांना अनेक दिवसांपासून हृदयविकारासह पोटाचे विकार झाला होता. प्रकृती खूपच बिघडल्यामुळं त्यांच्यावर गेल्या 11 मार्चपासून सोलापुरात एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी रूग्णालयात धाव घेऊन थोरात यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची अढळ निष्ठा
गांधी घराण्यावर एकनिष्ठ म्हणून संदीपान थोरात ओळखले जात होते. ते पेशाने वकील होते. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव हे त्यांचे मूळ गाव होते. तरुणपणीच काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले होते. 1977 साली काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांना राखील झालेल्या पंढरपूरच्या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तेव्हा देशभर जनता पक्षाची लाट असतानाही थोरात हे निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी मागे पाहिलेच नाही. पुढे 1980, 1984, 1989, 1991, 1996 आणि 1998 पर्यंत असे सलग सातवेळा थोरात यांनी पंढरपूर मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची अढळ निष्ठा होती. त्यामुळेच त्यांना लोकसभेत प्रदीर्घकाळ प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती.
1999 च्या निवडणुकीत पराभव
दरम्यान, 1999 साली काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. त्यानंतर त्याचवर्षी लोकसभा निवडणुका झाल्या. तेव्हा पंढरपूरमध्ये काँग्रेसनं पुन्हा आठव्यांदा संदीपान थोरात यांना उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांच्याकडून थोरात यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर संदीपान थोरात हे राजकारणापासून दूर राहिले होते.