1st April Headlines : आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. त्याअनुषंगांने नवीन आर्थिक नियम, योजना सुरू होणार आहेत. पंतप्रधान मोदी आणखी एका वंदे भारत एक्स्प्रेसला झेंडा दाखवणार आहेत. एप्रिल फूल दिवसाच्या निमित्ताने विरोधकांकडून सरकारविरोधात एप्रिल फूल दिवस साजरा करून आंदोलन करण्यात येणार आहे. जाणून घ्या आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी...



भोपाळ, मध्य प्रदेश


- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भोपाळच्या दौऱ्यावर आहेत. संयुक्त कमांडर संम्मेलन 2023 मध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होतील. भोपाल आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला दुपारी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.



पटियाला, पंजाब


- काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांची आज पटियाला जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे. 


मुंबई 


- भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया, खा. गोपाळ शेट्टी, आ. मनीषा चौधरी यांच्या समवेत दहिसर येथील “दहिसर (एकसर) अल्पेश अजमेरा BMC मुंबई महापालिका भूसंपादन घोटाळाबाबत पाहणी करण्यासाठी जाणार आहेत.


- काँग्रेस नेते माजी खासदार राहुल गांधी यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ 'जय भारत सत्याग्रह' घाटकोपर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन होणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, चरणसिंग सप्रा यांची आंदोलनाला उपस्थिती असेल.


- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 1 एप्रिल हा " एप्रिल फुलचा दिवस हा मोदीचा विकासाचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.


ठाणे 


- मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, भिवंडी अश्या एमएमआर क्षेत्रातील सर्वच वाहन चालकांचा त्रास वाढणार आहे. आजपासून मुंब्रा बायपास हा 1 महिन्यासाठी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या दरम्यान विविध कामे करण्यात येणार आहे. 


पिंपरी चिंचवड 


- पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांना डबल झटका लागणार आहे. द्रुतगती मार्गानंतर जुन्या पुणे मुंबई महामार्गाच्या टोल ही 18 टक्क्यांनी महागला आहे.


सोलापूर 


- दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी आणि कुरुल कॅनलमध्ये पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी भाजपा आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. 


नाशिक 


- जितेंद्र आव्हाड आज काळाराम मंदिरात जाणार आहेत. श्रीरामाच्या मूर्ती समोर संविधानाची प्रत यावेळी आव्हाड ठेवणार आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी छत्रपती संयोगीता यांच्या काळाराम मंदिरातील अनुभवानंतर आव्हाड काळाराम मंदिरात जाणार आहेत. 


- स्वराज्य संघटना आज काळाराम मंदिरासमोर आंदोलन करणार आहे.  संयोगिता राजे छत्रपती यांच्या संदर्भात काळाराम मंदिराच्या पुजाऱ्याकडून आलेल्या अवमाना प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन असणार आहे. 


नागपूर 


- शरद पवार हे आपल्या मध्यप्रदेशच्या दौऱ्याच्या निमित्ताने नागपूरला येणार आहेत. सायंकाळी 5 वाजता शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.


सिंधुदुर्ग 


- महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर मुंबई गोवा महामार्गावर बांदा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अत्याधुनिक सीमा तपासणी नाका आजपासून सुरू होत आहे. गोव्यातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश करणाच्या प्रत्येक वाहनाचे डिजिटल स्कॅनिंग होणार आहे. 


- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केलेल्या घोषणा, आश्वासनाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने 'एप्रिल फुल ढोल बजाओ' आंदोलन होणार आहे.


यवतमाळ 


- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून उमरखेड मधील विविध विकास कामांचे भूमीपुजन ते करणार आहेत.