Sandip Deshpande On MNS Mira Bhayandar Morcha: मिरा भाईंदर (Mira Bhayandar) व्यापारी संघटनेनं दिलेल्या माफीनाम्यानंतरही, मिरा भाईंदरमध्ये आज मराठी अस्मितेसाठी (Marathi Language Row) नियोजित मोर्चा निघणार का? याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, हा मोर्चा ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणावरून निघणारच, अशा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली. त्यामुळं मिरा भाईंदरमधलं राजकीय वातावरण तापलं असून, मनसेच्या वतीनं पोलिसांच्या नोटिसचा निषेध करण्यात आला. त्यानंतर आज सकाळी अविनाश जाधवांसह अनेक शिवसैनिक आणि मनसैनिकांना ताब्यातही घेण्यात आलं. त्यानंतर मात्र मनसैनिक आणि शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रुट बदलायला सांगत होतो, असं सांगितलं. अशातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचं खंडन करण्यात आलं आहे.
संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?
मोर्चाला परवानगी नाकारण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचं संदीप देशपांडे यांच्याकडून खंडन करण्यात आलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रुट बदलायला सांगत होतो. मला स्पष्टपणे सांगायचंय की, पोलीस मोर्चाची परवानगी द्यायला तयार नव्हते, आणि जो रुट बदलण्याचा विषय आहे तर, घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते, मोर्चा काढा घोडबंदर रोडवर, याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती. मीरा रोडमधल्या घटनेचा घोडबंदरमध्ये कुणी मोर्चा काढतं का?"
"तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावरही गुन्हे दाखल करायचे हो,ते आम्ही नाही म्हटलं नव्हतं, मात्र अशा खोट्या समजुती पसरवू नका... आता महाराष्ट्रातला मराठी माणूस मीरा-भाईंदरच्या दिशेनं निघाला आहे. आम्हाला पाहायचं आहे, जेलची क्षमता जास्त आहे की, मराठी माणसाची संख्या जास्त आहे... आता हे आंदोलन जोपर्यंत तुम्ही मोर्चाची परवानगी देत नाही, तोपर्यंत सुरू राहणार...", असं संदीप देशपांडे म्हणाले.
दरम्यान, मीरारोड इथे मराठीच्या मुद्द्यावर मनसेने मोर्चाची हाक दिली. त्यानंतर पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं जोरदार राडा झाला. पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता, मात्र जमावबंदीचा आदेश डावलून विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि शाब्दीक चकमक झडली. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. ठिय्या आंदोलनाचाही प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :