Nagpur: भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी इमारतीच्या वर गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झालाय. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावनगाव परिसरात ही घटना घडलीय. देव हाइट्स या इमारतीत भटक्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे घाबरून पळालेल्या मुलाचा तोल गेल्यानं तो थेट सहाव्या मजल्यावरून खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती कळमना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
मृत मुलाचे नाव जयेश रविंद्र बोकडे (वय 10) असे आहे. तो आपल्या एका मित्रासोबत इमारतीच्या जिन्यावरून वर चढत असताना एक भटकं कुत्रं त्याच्यावर भुंकायला लागलं. अचानक घाबरलेल्या जयेशने पळ काढला. घाबरून तो 6व्या मजल्यावरील जिन्याजवळील खिडकीजवळून खाली पडला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर कळमना पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. (Nagpur News)
नेमकं घडलं काय?
रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास तो खेळून घरी परतत असताना एक भटकं कुत्रं त्याच्यावर भुंकायला लागलं. कुत्रं त्याच्या अंगावर धावून येताच घाबरून जयेश इमारतीच्या वरच्या मजल्यावर पळत गेला. मात्र, घाईत त्याचा तोल गेला आणि तो थेट सहाव्या मजल्यावरून खाली पडला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. जयेशच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून, भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं जातंय. नागपुरात याआधीही अशा घटना घडल्या असून, या गंभीर प्रश्नावर नागपूर खंडपीठात एक याचिका देखील प्रलंबित आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
नागपूर शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या असून, हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. नागपूर खंडपीठात या विषयावर एक याचिका प्रलंबित आहे. मात्र, प्रशासनाकडून यावर ठोस उपाययोजना झाल्याचे दिसत नाही.
हेही वाचा