मुंबई : सणसवाडी इथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज (3 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबईत काल पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.


दरम्यान, संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दगडफेक प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी ही पत्रकार परिषद संभाजी ब्रिगेडच्या विनंतीवरुन घेत असल्याचं जाहीर केलं. संभाजी ब्रिगेडसोबतच महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी आणि जातीमुक्ती आंदोलन यांनीही पत्रकार परिषदेची विनंती केल्याचं आंबेडकर म्हणाले.

महाराष्ट्र बंद
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देतोय. लोकांनी शांततेत बंद पाळावा, कोणावरही जबरदस्ती करु नये. आम्ही कोणालाही आव्हान देत नाही आहोत, त्यामुळे प्रतिआव्हान म्हणून आम्ही शहर उघडतो, असं करु नये. त्यामुळे हा बंद शांततेत पार पडावा, अशी आमची इतर संघटनांना विनंती आहे."

सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री

पोलिसांचा हलगर्जीपणा
"ग्रामीण पोलिस अधीक्षकांना कॉल केला होते, त्यावेळी त्यांचा फोन आऊट ऑफ कव्हरेज होता. मुख्यमंत्री कार्यालयाला कॉल केला, त्यावेळी त्यांच्याकडे ही माहिती नव्हती. रणजीत पाटील यांच्या कार्यलयाकडेही सुरुवातीला माहिती नव्हती. त्यानंतर काही मिनिटांत अशी घटना झाल्याचं त्यांनी सांगितलं. यात पोलिसांचा हलगर्जीपणा मोठ्या प्रमाणात होता. दगडफेकीनंतर पोलिसांची कुमक उशिरा पोहोचली," असा आरोप आंबेडकर यांनी केला.

पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

"कोरेगाव ते शिरुरपर्यंतच्या इमारतींवर दगड ठेवण्यात आले होते. या इमारतींवरुन दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शिरुर-कोरेगाव-चाकणपर्यंतच्या गावांचं दोन वर्षांसाठी शासकीय अनुदान बंद करावं," अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे सूत्रधार
"शिवप्रतिष्ठान, हिंदू एकता आघाडी यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांमार्फत दगडफेक करायला लावली. तिथल्या गाड्याही जाळल्या. जे लोक परत जात होते, त्यांना मारहाण करुन गाड्याही जाळल्या," असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. "मनोहर उर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि मांजरीतील घुगे हे या घटनेचे सूत्रधार आहेत. त्यांनी हे सगळं कटकारस्थान रचलं आहे," असा दावा त्यांनी केला.

सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवारगावांचं अनुदान बंद करा

राग समजू शकतो, पण शांतता राखा
"राग आहे, चीड आहे मी समजू शकतो. पण त्याचा सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेणंही गरजेचं आहे. जिथे बंद पुकारला आहे, तो तातडीने थांबवावा आणि शांतता राबवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं,"असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

  • सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री
    पुण्यातील सणसवाडी इथे झालेल्या दगडफेकीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या घटनेची विद्यमान न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. "इंग्रज आणि पेशव्यांमधील लढाईला 200 वर्ष झाल्याने भीमा-कोरेगाव इथे दरवर्षी हजारो लोक येतात. एरव्ही इथे 15 ते 20 हजार लोक येतात, मात्र यंदा अंदाजे साडेतीन लाख लोक आले होते," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

  • दंगलीचा प्रयत्न मात्र पोलिसांची सजगता
    मुख्यमंत्री म्हणाले की, "मात्र डाव्या आणि सामाजिक संघटनांनी इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांच्या सहा कंपन्यांना इथे पाचारण करण्यात आलं होतं. इथे दंगल घडावी, असाच प्रयत्न होता. परंतु पोलिसांच्या सजगतेमुळे दंगल घडली नाही. दगडफेक आणि गाड्यांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या, मात्र पोलिसांनी अतिरिक्त कुमक लावून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्रीपर्यंत सर्व उपस्थितांना बसमध्ये बसवून सुखरुप घरी पोहोचवण्यात आलं."



  • सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार
    शरद पवार म्हणाले की, "भीमा-कोरेगावला दरवर्षी लोक जात असतात. तिथे जाऊन आपली भावना व्यक्त करतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. यावेळी 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. त्या ठिकाणी या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी घेतला असावा.लाखांहून अधिक लोक जमा होणार असताना मला वाटतं आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळेच आणि अफवा, गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे.""जे घडलं त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरु न देण्याची भूमिका घ्यावी. घडलेला प्रकार शोभादायक नाही. यावर पूर्णविराम कसा पडेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करु नये, किंवा चर्चा करु नये. जे काही करायचे असेल ते सामंज्यस्याने करावं," असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

  • सखोल चौकशी करा : रामदास आठवले
    गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी हजारो-लाखो कार्यकर्ते येतात. पण कधीही अनुचित प्रकार घडला नाही. पण ही पहिलीच वेळ आहे, काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी हिंसा भडकावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडे आहे. तसंच दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. लोकांना आवाहन आहे की, त्यांनी शांतात ठेवावी. शिवाजी महाराजांचे मावळे एकमेकांवर हल्ले करुन तुटून पडत आहेत, हे दृश्य कोणालाही न आवडणारं आहे.