Samruddhi Mahamarg Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. मध्यरात्री बुलढाण्याजवळ झालेला अपघात हा समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात, पण काल दिवसभरात आणि रात्रीही फक्त समृद्धीवरच नाही तर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक अपघातांची नोंद झाली. शुक्रवार पहाटे ते शनिवार पहाटे या 24 तासांत रस्ते अपघातामुळे राज्यात 43 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. एकट्या समृद्धी महामार्गावरील कालच्या 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा, सोलापूर आणि नाशिकसह राज्यात झालेल्या अपघातात 43 जणांचा मृत्यू झाला आहे.


बुलढाण्यात 25 जणांचा मृत्यू  -


नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात (Buldhana) भीषण अपघात झाला.  या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 प्रवासी जखमी झाले आहे.  मध्यरात्री दीड वाजता  समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पिंपळखुटा गावाजवळ बसचा अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले. 25 प्रवाशांचा गाडीमध्येच होरपळून मृत्यू झाला. अपघात झालेली बस विदर्भ ट्रॅव्हल्सची (vidarbha travels) खासगी बस होती. 


बुलढाणाच्या मलकापूरात अपघात 4 जणांचा मृत्यू -


शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर  बुलढाणाच्या मलकापूरजवळ ट्रक आणि खाजगी बसचा अपघात झाला. या अपघातात  एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेसह चार जणांचा मृत्यू. तर आठ जण जखमी झाले. जखमींवर मलकापूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   सुरतवरून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचे मलकापूर बायपासवर टायर पंक्चर झाले. पंक्चर दुरुस्त करण्यासाठी ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या एका बाजूला उभी करण्यात आली. मात्र, त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आशयरने या बसला धडक दिली. या धडकेत आयशरचा चालक आणि क्लिनर जागीच ठार झाले. 


समृद्धी महामार्गावरच कोपरगावात 3 जणांचा मृत्यू  


शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातील अपघातात तीन जण ठार तर 5 जखमी झाले.
क्रूझर जीप आणि आयशरच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. पती - पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीचा मृतात समावेश आहे. संतोष राठोड ( वय 35 ) , वर्षा राठोड ( वय 29 ) आणि अवनी राठोड ( वय दिड वर्ष ) अशी मयतांची नावे. मृत जालना जिल्ह्यातील मंठा गावचे रहिवासी..


सोलापुरात भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू 


अक्कलकोटजवळ  क्रुझर आणि टँकरचा भीषण अपघातात  सहा जणांचा मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. देवदर्शन करून कर्नाटकात गावी परत जाताना भाविकांवर काळाने घाला घातला. हा अपघात अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडीपासून दोन किलोमीटर अंतरावर अक्कलकोट-वागदरी रस्त्यावर झाला. मृतांमध्ये पाच महिलांसह एका मुलाचा समावेश आहे.जखमींना अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  


नाशिकमधील अपघातात 4 जणांचा मृत्यू 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी-सापुतारा महामार्गावर (Vani Saputara Highway) खोरीफाट्याजवळ मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने मारुती सियाज कारमधील चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यानंतर अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना गाडी बाहेर काढले. 


पुण्यात अपघात, 65 वर्षीय महिलेचा मृत्यू


पुणे सोलापूर महामार्गावर एका 65 वर्षीय वारकरी महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथे काल (शुक्रवारी) दुपारी हा अपघात झाला आहे


अकोटवरुन पुण्याकडे जाणाऱ्या बसचा अपघात -


अकोटवरून पुण्याकडे निघालेल्या लक्झरी बसचा हनवाडी फाट्याजवळ भीषण अपघात. अपघातात 70 प्रवासी जखमी. अकोटवरून शेगावमार्गे बस निघाली होती पुण्याकडे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्यामुळे बस रस्त्याखाली उलटली.


गोंदियात अपघात, 40 महिला मजूर जखमी 


गोंदियात धान रोवणीसाठी 40 मजुर महिलांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाचा अपघात झाला.  डवकी ते फुक्किमेटा मार्गावरील घटना घडली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील बोरगाव येथील महिला मजूर फुक्किमेटा येथे धान रोवणीच्या कामाला मिनीडोर वर बसून जात असताना वाहन चालकाचा गाडीवरून नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाली. त्यात 40 महिला मजूर जखमी झाल्या. गंभीर जखमी असलेल्या महिला मजुरांना गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.