Samruddhi Mahamarg Buldhana Accident : नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात (Buldhana) भीषण अपघात झाला. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 प्रवासी जखमी झाले आहे. मध्यरात्री दीड वाजता समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पिंपळखुटा गावाजवळ बसचा अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले. 25 प्रवाशांचा गाडीमध्येच होरपळून मृत्यू झाला. अपघात झालेली बस विदर्भ ट्रॅव्हल्सची (vidarbha travels) खासगी बस होती. बस रात्री साडे नऊ वाजता यवतमाळहून पुण्याकडे निघाली होती. कुणी शिक्षणासाठी घर सोडून पुण्याची वाट धरली होती तर कुणी नोकरीचा दिवस भरण्यासाठी आई-बाबांचा निरोप घेवून जन्मभूमी सोडून कर्मभूमीची वाट धरली होती. त्यांना कुठं ठावूक होतं की हा निरोप शेवटचा असेल. तिकीट काढताना त्यांना वाटलंही नसेल, त्यांचा हा प्रवास शेवटचा असेल समुद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) इतिहासातला हा सर्वात मोठा अपघात ठरला आहे.
बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही -
शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच 29 बीई 1899 क्रमांकाची बस बैद्यनाथ चौकातून नागपूरवरुन पुण्याच्या दिशेने निघाली बसमध्ये नागपूरवरुन सहा प्रवासी चढले होते. रात्री आठ वाजता यवतमाळला बस पोहोचली, येथून सहा प्रवासी बसमध्ये चढले. रात्री 10 वाजता बस कारंजामध्ये जेवणासाठी थांबली होती. रात्री 11 वाजता कारंजाजवळ असलेल्या इंटरचेंजवरुन बस पुण्याकडे निघाली. प्रवाशी झोपेत असताना रात्री 1.26 वाजता बुलढाण्यातील सिंदखेडराजाच्या पिंपळखुटाजवळ बसला अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले. काही कळण्याच्या आत बसचा स्फोट झाला. ज्यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला, जे मृत्यूच्या दाढेतून बचावले त्यांनी या अपघाताचा थरार सांगितला.
अपघाताची माहिती मिळताच पिंपळखुटा येथील नागरिक मदतीसाठी पोहोचले. दोन वाजताच्या आसपास अग्निशामन दलाच्या गाड्याही पोहचल्या. पोलिसही घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी जळालेल्या बसमधून मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेसात वाजेपर्यंत 25 मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर आठ वाजता फॉरेन्सिक टीमने घटना स्थळाचा आढावा घेतला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानेचं दुर्घटना, नागपूर परिवहन विभागाचा अहवाल -
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानेचं दुर्घटना झाल्याचा अहवाल नागपूर परिवहन विभागानं दिला आहे. बसचे टायर फुटल्यानं या बसचा अपघात झाला नसल्याची माहिती नागपूर परिवहन विभागानं दिली आहे. बुलढाण्याजवळ (Samruddhi Expressway) झालेला अपघात चालकाच्या चुकीमुळे झाल्याचा संशय महाराष्ट्र पोलिसांना आहे. दरम्यान, मृतदेह जळल्यामुळे ओळख पटवणे कठीण आहे. मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात येणार असल्याची माहिती बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
बुलढाणा बस अपघातातील मृत प्रवाशांची नावं
1.रामदास पोकळे
2.करण बुधबावरे
3.वृषाली वनकर
4.इशांत गुप्ता
5.शृजान गुप्ता
6.मेघना तायडे
7.तेजु राऊत
8.कैलाश गंगावणे
9.संजीवनी धोटे
10.कौस्तुभ काळे
11.सुशील केळकर
12.गुडिया शेख
13.राजश्री गांडोळे
14.राधिका खडसे
15.प्रथमेश खोडे
16.अवंती पोहणेकर
17.निखिल पाटे
18.कांचन गंगावणे
19.ऋतुजा गंगावणे
20.शोभा वनकर
21.ओवी वनकर
22.अरविंद राठोड – चालक
23.तेजस पोकळे
24.श्रेया वंजारी
25.तनिषा तायडे
बुलढाणा बस अपघातातील जखमी प्रवाशांची नावं
1.संदीप राठोड – क्लीनर
2.दानिश शेख इस्माईल- चालक
3.साईनाथ पवार
4.पंकज गाडगे
5.योगेश गवई
6.शशिकांत गजभिये
7.आयुष गाडगे
मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा -
दुर्देवी अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणाही केली. मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दुपारी साडे बारा वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अपघात स्थळाची पहाणी केली. दुपारी एक वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.
प्रत्येक जीव महत्वाचा, असे अपघात होऊन चालणार नाही : मुख्यमंत्री
ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. असे अपघात होऊन चालणार नाहीत. प्रत्येक जीव महत्वाचा आहे. सगळ्या उपाययोजना करण्यात येतील असे मुख्यमंत्री म्हणाले. दरवाजा खाली अडकल्याने प्रवाशांना बाहेर येता आले नाही. नाहीतर प्रवासी वाचले असते असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे. काही बाबतीत ते घटना दिसत नाही. अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक, 2 लाखांची मदत
बुलढाणा बस अपघाताच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
अपघाताच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. बस दुभाजकाला धडकल्यामुळं डिझेलची टाकी फुटीन बसला आग लागली. त्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आठ जण सुखरुप बाहेर आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवून देण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींचा रुगणालयाचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपाययोजना करत आहोत. याठिकाणी अपघात होणार नाहीत यासाठी प्रयत्न करत आहोत.
अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं उपाययोजना कराव्यात : अजित पवार
नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा - सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो. समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
दुर्देवी अपघातानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शरद पवार, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या इतर नेत्यांनी यावर सरकारला घेरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेत्यांनी या दुर्दैवी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.
बुलढाणा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आजचा मोर्चा रद्द
बुलढाणा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आजचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मोर्चा रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे भाजपचा मुंबईकरांचा आक्रोश आंदोलन आजच्या दिवशी स्थगित करण्यात आलं आहे. मुंबईकरांना ज्यांनी गेल 25 वर्ष लुटलं त्यांना प्रश्न विचारणारं आंदोलन आजच्या दिवशी स्थगित केलं असलं तरी आम्ही त्यांना प्रश्न विचारत राहू अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुंबई पालिकेवर धडक मोर्चा काढण्यावर ठाकरे गट ठाम आहे.