मुंबई: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जालना येथील ओबीसी मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून आता राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. भुजबळांच्या वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी टीकास्त्र सोडले असून स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 


राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का, असा खडा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला असून छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे. 


काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे?


छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.


 






 


प्रकाश आंबेडकरांचीही भुजबळांवर टीका 


आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. छगन भुजबळांनी जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्याठिकाणाहून मनोज जरांगेंना आव्हान देण्याची गरज काय होती असा सवालही त्यांनी विचारला. 


भुजबळांनी जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? 


वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पण आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेऊ. अंबडच्या आजच्या सभेत भुजबळांना जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार? आपल्याला एकत्र राज्यातच रहायचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. 


जरांगेंचा बोलविता धनी कोण विचारणाऱ्या राज ठाकरेंचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. 


ही बातमी वाचा: