जालना : अंबड येथील सभेतून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, "मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाचं खाताय म्हणतो, अरे तुझं खातो काय?, यांना काहीच माहित नाही. अरे आरक्षण काय आहे आधी ते तर समजून घे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असा म्हणतो, हो खातो बेसण भाकर कांदा आजही खातो. पण, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असा जरांगेंना भुजबळांनी टोला लगावला आहे. आमची सुद्धा लेकरं आहे, तुम्ही वेगळ आरक्षण घ्या, असे भुजबळ म्हणाले. 


मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जालन्यातील अंबडमध्ये ओबीसींची जाहीर सभा होत आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नयेत यासाठी सर्वात आधी मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांना ओबीसी नेत्यांचा देखील पाठिंबा मिळाला. दरम्यान, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी आज जालन्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेत भुजबळांची प्रमुख उपस्थिती आहे. तर याच सभेच्या भाषणातून देखील भुजबळ आपली भूमिका मांडत आहे.


कोण काय म्हणाले...


माजी आमदार आशिष देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले की, "बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनास्थळी सर्वात अगोदर देवेंद्र फडणवीस आले होते. ओबीसींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की, सरसकटचे दाखले मराठा समाजाला देता येणार नाही. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे करत आहेत. त्यामुळे, मनोज जरांगे यांनी आपला बाल हट्ट सोडावा, असे देशमुख म्हणाले. 


बबनराव तायवाडे यावेळी बोलतांना म्हणाले की, "मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. मराठा आंदोलकांकडून सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यमागास वर्गाकडून अगोदरच ओबीसीमध्ये आहेत, त्यांचे सर्वेक्षण करू नयेत, असे म्हणाले. 


काँग्रेस आमदार राजेश राठोड यावेळी बोलतांना म्हणाले की, "राज्यातले सखार कारखाने भटक्या आणि विमुक्त लोकांच्या जीवावर सुरू  आहेत. ओबीसी नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात वक्तव्य थांबवायला हवेत. या पुढे ओबीसी नेत्यांच्या विरोधात बोलत असेल, तर मोठा भाऊ असलेल्या लोकांना छोट करायला वेळ लागणार नाही, असे आमदार राजेश राठोड म्हणाले.  


ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यावेळी बोलतांना म्हणाले की, "जरांगेंच्या सभेला तितक्यात तोला मोलाचं उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा पाहावी, एका सभेवरती आम्ही थांबणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी अशीच सभा होईल. जरांगे सभा मोठी झाली म्हणजे आरक्षण मिळत नसतं. भुजबळांकडे या तुम्हाला ते आरक्षणाचा मार्ग दाखवतील. एक भुजबळ तुम्ही पाडाल तर, 160 मराठे आम्ही पाडू, असा इशारा यावेळी शेंडगे यांनी दिला. भुजभळ म्हातारे झाले असले, तरी सिंह आहेत. भुजबळ साहेब तुम्ही आदेश द्या ओबीसींची सत्ता आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कुणब्यांचे दाखले देतायत ते ताबडतोब बंद करा, अन्यथा 24 च्या निवडणुकीत कुठे पाठवायचं हे ओबीस ठरवेल. पालावरच्या भटक्य़ा विमुक्तींच्या नोंदी का तपासल्या जात नाही, असेही शेंडगे म्हणाले. 


लक्ष्मण गायकवाड म्हणाले की, विमुक्त भटके ओबीसी जोडा आणि प्रस्थापित मराठ्यांना पाडा. ईडा पीडा जाऊदे आणि ओबीसीचं राज्य येऊ द्या, आमच्या ताटात तुम्हाला जेऊ देणार नाही. ओबीसीचे राज्य आल्यावर तुमची गरिबी आम्ही दूर करू, पण आमच्या ताटात तुम्हाला जेवू देणार नाही. मराठ्यांची गरिबी 2024 ला ओबीसीचं राज्य आल्यावर दूर करू, असे लक्ष्मण गायकवाड म्हणाले. 


रासप प्रमुख महादेव जानकर म्हणाले की, "ओबीसीचा जोपर्यंत पक्ष होत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. जो पर्यँत ओबीसी समाजाचे पक्ष होत नाही, तोवर त्याला अर्थ राहत नाही. तर, काँग्रेस भाजपवाले तुम्हाला लुटून जातील असे जानकर म्हणाले आहे.