रत्नागिरी : ''चक्रीवादळ सुरू झालं म्हणून आमच्या कॅप्टननं जहाज नांगरण्याचे आदेश दिले. येमेनच्या जवळच असलेल्या छोट्याशा एका बेटाजवळ आम्ही आमचं मालवाहू जहाज नांगरलं. पण, काही वेळात समुद्री चाच्यांच्या तीन बोटी आमच्या जहाजाच्या दिशेनं आल्या. त्यांनी तिन्ही बाजुंनी जहाजाला घेराव घातला. काहीही हालचाल करू नका. अन्यथा रॉकेट लॉन्चरनं जहाज उडवू अशी धमकी त्यांनी आम्हाला दिली. त्यानंतर हे चाचे भराभर आमच्या बोटीवर चढले आणि त्यांनी आम्हाला बंदिस्त केलं. यावेळी त्यांनी बंदूकीतून फायरिंग देखील केली.


आमच्याकडील संवादाची सर्व साधनं त्यांनी काढून घेत आमची रवानगी चार दिवसानंतर एका हॉटेलमध्ये केली. एका खोलीत आम्ही 20 जण राहत होतो. आमची सुटका होईल की नाही? असे प्रश्न मनात येत होते. पण, दहा महिन्यानंतर आमची चाच्यांच्या तावडीतून सुटका झाली. हा काळ मानसिक कसोटी पाहणारा होता.'' हे शब्द आहेत रत्नागिरीतील फिरोज झारी यांचे. हा सारा थारा अनुभक थरारक, एखाद्या चित्रपटाला शोभेल असा असला तरी त्या दहा महिन्यात या 20 खलांशावर ओढावलेला प्रसंग ऐकताना मन सुन्न होते. शिवाय, अंगावर काटा देखील उभा राहतो. तब्बल 10 महिन्यानंतर अर्थात 7 डिसेंबरला 14 जण भारतात परतले. पण, याकाळात त्यांच्यावर ओढावलेला प्रसंग, त्यांची झालेली सुटका हे सारं काही ऐकल्यानंतर तिथल्या परिस्थिीतीतचा अंदाज येतो.


काय झालं त्या दिवशी?
फिरोज झारी मागील अनेक वर्षे मालवाहू बोटींवर काम करतात. 3 फेब्रुवारी 2020 रोजी एका खासगी मालवाहू बोटीतून ओमानमधील मसीरा या बेटावरून सकाळी पावणेदहाच्या आसपास ते निघाले. 'रेड सी'मधून त्यांचा हा प्रवास सुरू होता. त्यानंतर 10 दिवसांनंतर अर्थात 13 फ्रेबुवारी रोजी दुपारच्या वेळेस वादळ आलं म्हणून कॅप्टननं येमेनजवळच्या एका बेटाजवळ बोट नांगरण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांची एक बोट बुडाली होती. बोट नांगरून काही वेळ गेला नाही तोच समुद्र चाच्यांनी थेट हल्ला चढवला. त्यानंतर पुढील काही वेळातच बोटीवर त्यांचा ताबा होता. हातात रॉकेट लॉन्चर, बंदुका अशा सज्जतेनं समुद्री चाचे होते. बोटीवर आल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी सर्वांकडून लॅपटॉप, मोबाईल, आयपॅड, गॉगलसह सर्व सामान काढून घेत सर्वांना आपल्या ताब्यात घेतलं. यामध्ये एकूण 20 प्रवाशांचा समावेश होता. यामध्ये 14 भारतीयांसह इतर देशातील सहा जणांचा समावेश होता. पण, सारी परिस्थिती पाहता फिरोज झारी यांनी अत्यंत चालाखीनं एक मोबाईल लवपून ठेवला होता. पुढे तोच मोबाईल या सर्व खलाशांसाठी महत्त्वाचा ठरला. चार दिवस बोटीवर काढल्यानंतर त्यांना पुढे एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. या साऱ्या घडामोडीमध्ये सर्वांच्या घरच्यांना मात्र या प्रसंगाबाबत काहीच कल्पना नव्हती. एका छोट्याशा खोलीत त्यांना ठेवलं होतं. जेवण देखील नीट मिळत नव्हतं.



..तर फिरोज आज सुखरूप आलेच नसते
''आम्हाला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी बोट किनाऱ्याकडे घ्या असे आदेश दिले. पण, तांत्रिक कारणास्तव नांगर काढता येत नव्हता. आम्ही हे सारं जाणूनबुजून करतोय असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी मी नांगर कापण्याचा निर्णय निर्णय घेतला. त्यानुसार मी कामाला सुरूवात देखील केली. यावेळी काही वेळ जात होता. त्यामुळे हे चाचे अधिक आक्रमक झाले. त्यांनी माझ्यावर गन रोखत फायर करण्याचा निर्णय घेतला. पण, माझ्या सुदैवानं बांग्लादेशच्या खलाशाला त्यांची भाषा थोडीथोडकी का असेना येत होती. त्यानं त्यांना हे सारं समजावून सांगितलं. त्यामुळे माझा जीव वाचला. अन्यथा त्यांनी माझ्यावर गोळी झाडली असती'' असा अनुभव देखील फिरोज झारी यांनी यावेळ कथन केला.


'तो' मोबाईल पडला उपयोगी
फिरोज झारी यांनी लपवलेला मोबाईल या सर्वांच्या कामी आला. कारण, हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी व्हॉट्सअपच्या मदतीनं बोटीच्या मालकासह, घरच्यांना आपल्या परिस्थितीची कल्पना दिली. हॉटेल लोकेशन, त्याचं कार्ड आणि आपल्यावर ओढावलेला प्रसंग त्यांनी संबंधित लोकांना कळवला. पण, समुद्री चाच्यांना ज्यावेळी याची माहिती मिळाली त्यानंतर मात्र त्यांनी तो देखील काढून घेतला. यावेळी 'आमच्याकडे मोबाईल नसता तर आम्ही सुरक्षित आलो असतो की नाही? शिवाय, आमच्याबद्दल कुणाला काही कळलं असतं की नाही याची देखील आम्हाला खात्री नव्हती' अशी प्रतिक्रिया फिरोज झारी देतात. यानंतर भारतीय दुतावास असो किंवा दुबईतील भारतीय नागरिक यांची मोठी मदत झाल्याची प्रतिक्रिया या बोटीवरील खलाशी देतात. 'जवळपास चार महिन्यानंतर आम्हाला आएमओवरून आमच्या घरच्यांशी आठवड्यातून एक मिनिटं बोलण्याची परवानगी होती. पण, सारा काळ आमच्यासाठी कठिण होता. घरी परतण्याची आम्हाला ओढ होती. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत होतो.' असं सांगताना झारी यांचा घसा कोरडा पडत होता.


'घरंच वातावरण चिंतेचं'
या काळात सर्वांच्या घरी चिंतेचं वातावरण होतं. या खलाशांच्या घरी येण्याकडे सर्वांचे डोळे होते. ''कोरोना काळ सर्वांसाठीच कठिण होता. अशीवेळी माझे पती आमच्याजवळ नव्हते. त्यात ते संकटात असल्यानं जीवाला घोर लागला होता. त्यात माझी दोन मुलं आणि त्यांचा सांभाळ करणं हे माझ्यासाठी आणखी अवघड होतं. माझी प्रकृती साथ देत नाही. त्यात नवरा चाच्यांच्या ताब्यात अडकल्यानं विचार करून सतत ती आणखी बिघडत होती. आर्थिक परिस्थिती देखील हालाखीची होती. घरात पैसे नव्हते. यांचा पगार देखील झालेला नव्हता. मुलांकडून देखील बाबा कधी येणार? याची सातत्यानं विचारणा होत होती. विमानं बंद असल्याचं कारण देत काही दिवस गेले. पण, त्यानंतर त्यांना देखील याची कल्पना आली. या काळात मी बोट मालक आणि एजंट यांच्याशी देखील संवाद साधला. यावेळी ते चार दिवसात सारं काही सुरळीत होईल असं उत्तर देत होते. मुलगा देखील त्याच्याशी बोलत होता. पण, काही दिवसानंतर त्यांनी देखील उत्तर देणं बंद केलं. त्यामुळे काहीच सुचत नव्हतं. मन सुन्न झालं. सारं काही संपलं की काय? असं वाटू लागलं. ही प्रतिक्रिया आहे फिरोज झारी यांच्या पत्नीची. कामाला जाण्यापूर्वी 11 महिने ते घरात होते. त्यात आता या 10 महिन्यांचा पगार नाही. त्यामुळे आम्ही जगायचं कसं? मुलांच्या शाळेची फी, घराचा हफ्ता हे अद्यापही जैसे थे आहे. नातेवाईक तरी किती काळ पैसे देणार? आता पैसे तरी कुणाकडे मागणार? असा सवाल फिरोज यांच्या पत्नीनं करत सरकारनं यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी केली आहे.


दुबईतील भारतीय लोकांचा सुटकेसाठी पुढाकार
या कठिण काळात दुबईतील दूतावासाह भारतीय उद्योजक डॉ. सुनिल मांजरेकर आणि धनंजय दातार यांनी देखील पुढाकार घेतल्याची माहिती फिरोज झारी यांनी दिली. या लोकांना त्यांचा पगार मिळावा याकरता मालकाशी फेस टू फेस बोलणं सुरू आहे. शिवाय, इन्शुरन्स कंपनीशी देखील बोलणं सुरू असल्याची प्रतिक्रिया डॉ. सुनिल मांजरेकर यांनी दिली. तर, मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या धनंजय दातार यांनी या खलाशांना काही आर्थिक मदत देखील केल्याची माहिती झारी यांनी 'एबीपी माझा'ला दिली. भारतीय दुतावास आणि या उद्योजकांमुळे आज आम्ही सुखरूप आहोत. अशा शब्दात झारी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच याच लोकांमुळे आम्हाला यामध्ये न्याय मिळेल असा आशावाद देखील ते व्यक्त करतात.


इतर सहकाऱ्यांच्या काय अनुभव?
या जहाजावर असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी राज्यातील सहा जण होते. यामध्ये अलिबागच्या तन्मय माने यांचा देखील समावेश होता. याबाबत बोलताना ''गन पॉईंटवर ठेवत ते आम्हाला येमेनच्या किनाऱ्यावर घेऊन गेले. त्याठिकाणी कोस्टगार्डकडून आमची चौकशी झाली. त्यात त्यांच्या हाती काही लागलं नाही. मग त्यांनी थेट पैशांची मागणी केली. आम्ही ती गोष्ट आम्ही मालकाला सांगितली. बोट मालकांनं ती पूर्ण केली. त्यानंतर आम्ही 10 महिने एका खोलीत बंद होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे.


आता या साऱ्यांची काय अपेक्षा?
20 पैकी 19 खलाशांचे सर्व कागदपत्रं चाच्यांकडून परत केली गेली. पण, अद्याप फिरोज झारी यांना मात्र त्यांची कागदपत्रं मिळालेली नाहीत. कदाचित मोबाईल लवपून ठेवल्यानं त्यांनी माझी कागदपत्रं परत केलेली नसावीत अशी शंका फिरोज व्यक्त करतात. ''जर ही कागदपत्रं नसतील तर मी पुन्हा कामावर जाऊ शकत नाही. त्यामुळे माझा भविष्यकाळ अंधकारमय वाटू लागला आहे. या कादगपत्रांवर सारं काही अवलंबून आहे. भारतीय दूतावासानं यामध्ये लक्ष घालावं. माझ्या कुटुंबाकरता हे सारं गरजेचं आहे. याचा विचार करावा'' अशी विनंती सध्या फिरोज करत आहे. तसेच सरकार आणि इतर लोकांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश नक्की येईल अशी आशा देखील फिरोज यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना आहे.