शिर्डी : शिर्डी साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय लांबणीवर गेला आहे. राज्यसरकारने दोन आठवड्याची मुदत औरंगाबाद खंडपीठात मागितली असून  दोन आठवड्यात विश्वस्त मंडळ करू अशी ग्वाही सरकारने  खंडपीठासमोर  दिली आहे.  राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या निवडीची घोषणा झाली होती.


शिर्डी संस्थानची नियुक्ती यादी जरी अंतिम झाली असली तरी ती यादी औरंगाबाद खंडपीठासमोर सरकारने सादर केली नाही. नियुक्ती अंतिम झाल्याची माहिती सरकारी वकिलांनी औरंगाबाद खंडपीठात दिली, याबाबत येत्या 2 आठवड्यात अधिसूचना निघेल तेव्हा ती यादी आम्ही कोर्टात सादर करू असे सांगत दोनआठवड्याचा अवधी मागून घेतला आहे. पुढील सुनावणी येत्या 5 जुलै ला ठेवण्यात आली आहे. जनहित याचिका सुनावणी दरम्यान ही माहिती सरकारने कोर्टात दिली आहे. 


औरंगाबाद हायकोर्टाने मुदत वाढवून दिल्यानंतर आता अध्यक्ष उपाध्यक्षासह सदस्य कोण होणार याची पुन्हा उत्कंठा वाढली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाटपावरून मतभेद आहेत का? असा सवाल  उपस्थित होत आहे. कारण सकाळी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या निवडीची घोषणा झाली होती. अजूनही विश्वस्त मंडळाचा अंतीम निर्णय झालेला नाही. दोन आठवड्यात सरकार करणार विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात येईल अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकिल अजिंक्य काळे यांनी दिली आहे.  


शिर्डी हे देशातील दुसऱ्या स्थानावरील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान आहे. देशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीवरून महाविकासआघाडीमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे.