शिर्डी : औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळांच्या अध्यक्षपदी  राष्ट्रवादीचे  आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आले आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली होती. या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु होती.  


निवड झाल्यानंतर  राष्ट्रवादीचे  आमदार आशुतोष काळे म्हणाले, शिर्डी येथील साई संस्थानचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे आनंद होत आहे. आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर या जागेवर अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळाली होती. परंतु पहिल्यांदाच आता तरुण नेतृत्वाकडे अध्यक्षपदाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. या आगोदर अध्यक्षपद नेहमी काँग्रेसच्या वाटेला असायचे. परंतु यंदा मात्र काही बदल करण्यात आले आहेत. यंदा शिर्डी संस्थांनचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर पंढरपूर देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे. मागील काही दिवसांत ज्या काही घडामोडी शिर्डीमध्ये घडल्या आहेत. यामध्ये लक्ष घालणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यासोबत अनेक कडक नियम देखील घालण्यात आले आहेत. याबाबतीत पुढाकार घेऊन मी देवस्थान ट्रस्ट आणि पत्रकार यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार आहे. 


साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळात अध्यक्ष ,उपाध्यक्ष आणि 15 सदस्य असतात. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला प्रत्येकी पाच सदस्य नेमता येणार आहेत. 2004 पासून साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या मंडळाची मुदत तीन वर्षे आहे. 2016 साली भाजप सरकारने 17 पैकी 11 सदस्यांची नियुक्ती केली होती. मात्र नियुक्तीच्या अटी पाळल्या न गेल्याने आणि काही सदस्यांनी सलग तीन बैठकांना दांडी मारल्याने तत्कालीन विश्वस्त मंडळ उच्च न्यायलायने बरखास्त केले होते. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा केला होता. मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद हे शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीसाठी आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु होती.