मुंबई/अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 50 कोटी रुपये मिळणार आहेत. साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य सरकारनेही जीआर जारी केला आहे.

राज्यातील जनतेला अर्थ सहाय्य व्हावं, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत शिर्डीच्या साई संस्थांनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 कोटी रुपये अर्थसहाय्य म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत साई संस्थानने सरकारला 5 नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून हा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे 50 कोटी रुपयांचा निधी अर्थसहाय्य म्हणून देण्यास मान्यता दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शिर्डीतील साईबाबा संस्थानकडून 500 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज घेतलं होतं. हा निधी राज्य सरकार अपूर्ण असलेल्या निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर नगर जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

राज्य सरकारने कुठल्याही संस्थेकडून एवढं कर्ज घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हे कर्ज फेडण्यासाठी सरकारला कुठलीही कालमर्यादा घालण्यात आलेली नाही.