नागपूर : मोबाईलचा अतिवापर जीवावर बेतू शकतो, तसाच एक प्रकार नागपुरात समोर आला आहे. नागपूरमध्ये एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र ब्लू व्हेल या मोबाईल गेमच्या नादात तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


नागपुरातील नरेंद्रनगर परिसरातील एका 17 वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या मुलीने आपल्या हातावर 'कट हियर टू exit' हे वाक्य लिहिलं होतं. त्यामुळे मोबाईल गेमच्या नादात तिनं मरणाला जवळ केलं का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


आत्महत्या केलेली मुलगी अभ्यासात अत्यंत हुशार होती. मात्र बारावीला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने मनासारक्या कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा अभ्यास करण्यासाठी तिने यंदा ड्रॉप घेतला होता. कॉलेज नसल्याने तिच्याकडे बराच वेळ होता. दरम्यान तिला मोबाईल गेम खेळण्याची सवय लागली आणि कधी ती त्याच्या आहारी गेली तिलाही कळले नाही.


'ब्लू व्हेल' गेम ती जास्त खेळायची. या गेममध्ये विविध जीवघेणे टास्क असतात. यामध्ये मुलं हातावर किंवा खांद्यावर एक ठराविक गोष्ट कोरतात. कागदावर व्हेल माशाचं चित्र काढतात. त्यानंतर सिक्रेट टास्क मिळतो, आलेला सिक्रेट मेसेज खांद्यावर कोरुन घेतात. त्यानंतर व्हेल असल्याचा ऑनलाईन मेसेज टाकला जातो. या गेममध्ये असे 50 टास्क असतात आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यासोबत हा गेम संपतो.


हल्ली मोबाईलवर गेम खेळणं हे मुलांसाठी व्यसन बनलं आहे. प्रत्येक नवीन गेम हा मुलांच्या कुतहलाचा विषय असतो. त्यामुळे अशावेळी पालकांनी जागरुक राहणं आवश्यक आहे. अन्यथा आपल्या पाल्याचा गेम ओव्हर कधी झाला हे पालकांना कळणारही नाही.