Beed : अभिनेते, निसर्गप्रेमी सयाजी शिंदे (Sayaji shinde) यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बीड मधील सह्याद्री देवराईला (Sahyadri Devrai) आग लागली आहे. आगीमुळे दोन एकरवरील झाडाचं नुकसान झालं आहे. दुपारच्या सुमारास ही आग लागली आहे. तब्बल दोन तासांनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात यश मिळालं आहे.
सह्याद्री देवराईला भीषण आग लागली असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आग जास्त पसरत गेली. तब्बल दोन तासानंतर ही आग विझवण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळालं आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पालवन गावाजवळ 25 एकर सह्याद्री देवराईचा परिसर आहे. या ठिकाणी सर्व देशी झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. आता वड, पिंपळ आणि लिंबाचे झाड जळून खाक झाले आहे. आगीत तब्बल दोन एकरचा परिसर जळून खाक झाला आहे.
अभिनेते आणि निसर्गप्रेमी सयाजी शिंदे वृक्ष लागवडीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. ते सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विविध देवराया उभ्या केल्या आहेत. सयाजी शिंदे यांनी स्वतःला वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनात झोकून दिले आहे. माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू तब्बल 200-300 वर्षे देण्याचं काम झाडंच करत असतात. हीच बाब लक्षात घेत सयाजी शिंदे आणि त्यांची टीम झाडे लावणे आणि ती जगवण्याचं कार्य करीत असते.
संबंधित बातम्या