मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली आहे.त्यानुसार, शिवसेनेनं मंत्री संदीपान भुमरेंना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार असून चंद्रकांता खैरे विरुद्ध संदीपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत होणार आहे. संभाजीनगर येथील जागेसाठी भाजपानेही जोर लावला होता. त्यामुळे, ही जागा भाजपाला सुटणार की शिवसेनेला याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मंथन होत होतं. अखेर, शिवसेनेनं बाजी मारली असून संदीपान भुमरे खैरेंविरुद्ध निवडणूक लढणार आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत संदीपान भुमरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आता, शिवसेनेच्या पत्रकातून अधिकृतपणे उमेदवारीची घोषणा झाली. संभाजीनगरमधून गत 2019 च्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील निवडून आले होते. त्यावेळी, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती. पण, यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हीबीएने काँग्रेसचे माजी नगरसेवक अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, यावेळी संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत होत असली तर प्रामुख्याने ही तिरंगी लढत आहे. तर, चंद्रकांत खैरे यांनी यंदाची ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, शिवसेनेत बाण चालणार की मशाल हे पाहावे लागेल. 






 


दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, व्हीबीए आणि एमआयएम दोन्ही पक्ष मित्र होते, तेव्हा त्यांना महाराष्ट्रात मतदान झालेल्या वैध मतांपैकी 6.99% मते मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) आठ जागांच्या संभाव्यतेचे नुकसान झाले होते. तर, संभाजीनगरची जागा एमआयएमने जिंकली होती.  
 
चंद्रकांत खैरे विरुद्ध संदिपान भुमरे असा होणार सामना


महाविकास आघाडीने याआधीच छत्रपती संभाजीनगरासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार, असे विचारले जात होते. शिवसेना-भाजप यांच्या युतीत हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिलेला आहे. यावेळी मात्र भाजपनेदेखील या जागेवर आपला दावा सांगितला होता. परिणामी या जागेवर महायुतीने उमेदवाराची घोषणा केली नव्हती. दरम्यान, आता संदिपान भुमरे यांच्या नावावर मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे.


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार


संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांमघ्ये लढाई रंगणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीतच संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर आता संदिपान भुमरे यांनीदेखील तयारी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते येत्या २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.