Raver Lok Sabha Election 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी आमदार संतोष चौधरी (Santosh Chaudhary) हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांचा पत्ता कट करत शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर संतोष चौधरी यांनी बंडखोरीचा इशारा दिला असून येत्या 24 तारखेला ते लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून रावेर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्याने संतोष चौधरी हे बंडाच्या तयारीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. 


संतोष चौधरी पवार साहेबांच्या लढ्यात साथ देतील - जयंत पाटील 


जयंत पाटील म्हणाले की, रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी पक्षाचे नाराज असलेले माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. संतोष चौधरी यांनी आजपर्यंत शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून काम केले आहे. यापुढेही ते पवार साहेबांच्या लढ्यात त्यांना साथ देतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 


श्रीराम पाटील हे रावेर लोकसभेतून विजयी होणार - जयंत पाटील 


दरम्यान, उद्या (दि. 20) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे रावेर लोकसभेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यापूर्वीच जयंत पाटलांकडून रावेर लोकसभेतील नाराजी नाट्य दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान पदाधिकाऱ्यांची घेण्यात आलेली बैठक ही आढावा बैठक असून श्रीराम पाटील हे रावेर लोकसभेतून विजयी होणार असल्याचा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे.


नेमकं काय म्हणाले होते संतोष चौधरी? 


संतोष चौधरी म्हणाले होते की,  गेल्या पंधरा वर्षापासून आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत. तरीदेखील आपल्यावर अन्याय करण्यात आला. याबाबत आपण पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. येत्या 24 तारखेला आपण लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहोत, असे त्यांनी म्हटले.  मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र त्यांनी जाहीर केलेलं नाही. 


आणखी वाचा 


Raksha Khadse : नाथाभाऊनंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य